कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड येथे वीरमरण आले होते. नेरळमधील कोतवालवाडी ट्रस्टमध्ये या हुतात्म्यांचा बलिदान दिन तिथी (मार्गशीर्ष एकादशी)प्रमाणे साजरा करण्यात आला. कोतवालवाडी येथील शहीद भवन येथे ट्रस्टच्या अध्यक्षा आणि जि. प. सदस्या अनसूया पादिर यांच्या हस्ते शनिवारी पहाटे सहा वाजून 10 मिनिटांनी क्रांतिज्योत प्रज्ज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष शरद पाटील, विश्वस्त संध्या देवस्थळे, शेखर भडसावळे, राम ब्रह्मांडे, सावळाराम जाधव, नेरळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, लार्सन अॅन्ड ट्युब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमोद निगुडकर, सुप्रिया कांबळे, जे. व्ही. ग्लोकल ट्रस्टचे डॉ. अमोल जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी जे. व्ही. ग्लोकल ट्रस्ट, कोतवालवाडी ट्रस्ट आणि लार्सन अॅन्ड ट्युब्रो पब्लिक चॅरिटेबल या संस्थे मार्फत आणण्यात आलेल्या मोफत फिरत्या दवाखान्याचे (मोबाईल व्हॅन)चे लोकार्पण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी रुग्णवाहिका लोकार्पण करताना नारळ वाढवला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे, महिला विकास केंद्राच्या पॅरपेट फर्नांडिस, भारती शिंगोळे, अभिश्री कांबळे, रश्मी दाभिलकर आदी उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नेरळ परिसरातील 20 दुर्गम आदिवासी गावपाड्यांवर जाऊन गरीब गरजूंना मोफत आरोग्य सेवा पुरवून त्यांना औषधे दिली जातील. या मोबाईल व्हॅनमध्ये डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्यांची टीम असणार आहे, अशी माहिती डॉ. अमोल जाधव यांनी या वेळी दिली. नेरळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव गायकवाड, माजी उपसरपंच बल्लाळ जोशी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र लोभी, अनुराधा भडसावळे, अपर्णा कर्वे, डॉ. हेमंत भामरे, डॉ. सागर काटे आदींसह विद्यार्थी आणि नागरिक या वेळी उपस्थित होते.