Breaking News

निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती

शहरात ठिकठिकाणी नुकसान

पनवेल : बातमीदार

जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळात झालेल्या हानीची पुनरावृत्ती बुधवारी (दि. 5) नवी मुंबईत पाहायला मिळाली. दुपारी वादळी वार्‍यासह सुरू झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी सुमारे 200 झाडे कोसळली. तर अनेक ठिकाणी इमारती आणि घरांवरील पत्रे उडून गेले. वादळात वृक्ष विद्युत तारांवर उन्मळून पडल्याने नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. कोरोना संसर्गामुळे घरी असलेल्या नागरिकांना सावधगिरीचा उपाय म्हणून घरीच राहण्याच्या सूचना पालिकांनी दिल्या आहेत. सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या कालावधीत 115.78 मिमी. पाऊस झाला.

बुधवारी सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी पावसाचा जोर वाढला. सोसाट्याचा वार्‍यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर नागरिकांची दाणादाण उडाली. पावसामुळे दुचाकीस्वारांना वाहने वाटेतच थांबवून आडोसा शोधावा लागला. तर काहींना दुचाकी चालवणे अशक्य झाले होते. पावसाच्या मार्‍यापासून इमारतीचे नुकसान होऊ नये, यासाठी लोखंडी सांगाड्यावर उभारण्यात आलेले पत्रे जोरदार वार्‍याने उडून गेले. काही ठिकाणी पत्रे रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर जाऊन पडले. यात काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

नेरुळ-उरण फाट्याहून जाणार्‍या मार्गावरही झाडे कोसळली. शहरातील अंतर्गत एका रस्त्यावर पाच झाडे कोसळल्याची घटना घडली. नेरुळ, सीवूड्स आणि बेलापूर परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसला. नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, तसेच पाटील स्टेडियमवरचे छतही कोसळले.

इंटरनेट सेवा विस्कळीत

बुधवारी दुपारनंतर नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात केबल आणि इंटरनेट सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान भरून निघत नाही, तोच मुसळधार पावसामुळे काही किलोमीटर अंतरावर टाकण्यात आलेल्या केबल जागोजागी तुटल्या.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply