पेण : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत पेण तालुक्यातील 54 गावांमध्ये राबविण्यात येणार्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 60 कोटी 78 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रभावीपणे ही योजना राबवावी, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रविवारी (दि. 3) आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. वैकुंठ निवास येथे झालेल्या या बैठकीस माजी सभापती बाळाजीशेठ म्हात्रे, माजी जि. प. सदस्य वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्रचिता पाटील, वढावच्या सरपंच पूजा अशोक पाटील, मसदचे सरपंच बळीराम भोईर, शिर्कीच्या सरपंच धनश्री गणेश पाटील, दादरचे सरपंच विजय पाटील, वाशीचे सरपंच गोरख पाटील, कणेचे सरपंच कुणाल पाटील, शेडाशीचे सरपंच बाबू कदम, तरणखोपचे सरपंच अभिजित पाटील, गागोदेचे माजी सरपंच शिवाजी पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, अमृतशेठ म्हात्रे, नरेश पाटील, प्रवीण पाटील आदींसह सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. सन 2014मध्ये केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजना जल जीवन मिशनमध्ये भाजप सरकारने समाविष्ट केली. या योजनेला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले असून, प्रत्येक घरास 2024पर्यंत स्वतंत्र नळाद्वारे पाणी देण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील गावांचा आराखडा ग्रामपंचायत स्तरावर बनविण्यात आला असून, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनद्वारे याला अंतिम रूप प्राप्त झाल्याने गावागावात या योजनेचे काम सुरू होणार आहे. तेव्हा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी या बाबतीत सतर्क राहून आपल्या ग्रामस्थांची नळ पाणीपुरवठा योजनेची कामे योग्य प्रकारे मार्गी लावावीत, असे आमदार रविशेठ पाटील या वेळी म्हणाले.
काही पक्षांची श्रेयासाठी धडपड : वैकुंठ पाटील
भाजप सरकारने ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या समस्या तसेच टँकरद्वारे होणार्या पाणीपुरवठ्यावर लाखो रुपयांचा अवाढव्य खर्च आणि पाण्यावाचून ग्रामीण भागातील होणारी लोकांची पायपीट थांबावी हे सर्व लक्षात घेऊन जल जीवन मिशन अंतर्गत हर घर मे नल से जल या योजनेला मूर्त स्वरूप दिले आहे, पण याचे श्रेय सध्या अन्य राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नेतेमंडळी घेऊ लागले आहेत. त्यांची ही धडपड केविलवाणी असल्याचा उपरोधिक टोला माजी जि. प. सदस्य व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी या वेळी लगावला.