कर्जतमध्ये रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा
कर्जत : बातमीदार
सिध्दगडाच्या स्वातंत्र्य संग्रामवर आधारित ‘बलिदानाचा संदेश‘ हे पुस्तक तरुण पिढीला प्रेरणादायी असून सर्वांनी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याची माहिती करून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन या पुस्तकाचे लेखक वसंत कोळंबे यांनी येथे केले.
‘बलिदानाचा संदेश‘ या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे तसेच हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे वारसदार यांच्या हस्ते नुकतेच झाले. कर्जत शहरातील महिला मंडळ सभागृहात झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या सुरूवातीस क्रांतिवीरांच्या वारसदारांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
क्रांतिवीर भाई कोतवाल, क्रांतिवीर हिराजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगड येथे हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांनी केलेल्या क्रांतिकार्याचा आणि घडलेल्या घटनांचा उहापोह ‘बलिदानाचा संदेश‘ या पुस्तकात करण्यात आला आहे. भाई कोतवाल यांनी कर्जत येथे इंग्रज सत्तेविरुध्द लढा देण्यासाठी ‘आझाद दस्ता‘ स्थापन केला व त्याद्वारे विविध क्रांतिकारी कार्य केले. या सर्व गोष्टींचे माहिती या पुस्तकात दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कोंडिलकर यांनी केले.
या प्रकाशन सोहळ्यावेळी सुनील रसाळ यांनी सिद्धगडच्या स्वातंत्र्य संग्रामाची माहिती देणारा पोवाडा गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. माधव कोळंबे, महेश कोळंबे, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. या वेळी स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार शोभाताई कुट्टी, विठ्ठल वाळकु पाटील, शरद राघो भगत, मोहन नरहर ठोसर, चंदर रूपा कातकरी, महादेव बाळकृष्ण जुन्नरकर, नंदाताई डांगरे, एकनाथ जाधव, अनुसया जामघरे व नागरिक उपस्थित होते.