Breaking News

कर्जत धामोते गावात हाणामारी

दोन्ही गटातील 11 जखमी

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील कोल्हारे ग्रुपग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या एका उमेदवाराने जमावबंदी असतानाही 21 जानेवारी रोजी रात्री विजयोत्सव साजरा केला. त्या वेळी फटाके फोडण्याच्या प्रकारावरून धामोते गावातील दोन गटात हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटातील 11 जण जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकारणी नेरळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये दोन प्रभागातील सहा जागा जिंकणार्‍या शिवसेना कार्यकर्त्यांनी 21 जानेवारी रोजी विजयी मिरवणूक काढली. निवडणुकीची आचारसंहिता आणि जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदी आदेश लागू असतानाही हे कार्यकर्ते धामोते गावात रात्री मिरवणूक काढून फटाके फोडत  होते. शेकापशी संबंधित असलेल्या तरुणाने फटाके वाजविण्यास हरकत घेतली. त्या वेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शिवाजी विरले यांच्या घरासमोर फटाके फोडून विजय उत्सव साजरा करणारे कार्यकर्ते शिवीगाळ करीत होते. आधी बाचाबाची आणि नंतर गैरकायद्याची मंडळी जमवून विजयोत्सव साजरा करणार्‍या कार्यकर्त्यांनी लोखंडी सळई आणि लाकडी दांडके यांच्या सहाय्याने शेकापशी संबंधित दहा जणांना मारहाण केली. त्यात  सात जण जखमी झाले असून त्यातील चार जणांना बदलापूर येथील खासगी रुग्णालयात रात्री दीड वाजता दाखल करण्यात आले. जखमी चंद्रकांत मुंढे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून दोन नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांसह 10 शिवसेनेशी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर विजयोत्सव साजरा करणारे कार्यकर्ते राजेश विष्णू विरले हे घरात जेवण करीत असताना त्यांना भांडणाचा आवाज आला. बाहेर आल्यानंतर त्यांना तसेच अन्य तीन जणांना शेकाप संबंधित आठ जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके यांच्या सहाय्याने मारहाण करून जखमी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील 18 जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply