अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड पोलीस दलातील 452 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनातून पुर्ण बरे झालेले पाच पोलीस कर्मचारी सोमवारी (दि. 19) पुन्हा एकदा कामावर रुजू झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्यासह अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून कोरोना योद्ध्यांचे स्वागत केले.
रायगड पोलीस दलात आतापर्यंत 452 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 444 जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत. तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर चौघांवर सध्या अलिबाग पोलीस मुख्यालयातील विशेष कोविड केअर सेंटर आणि नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस दलातील मध्यम ते तीव्र लक्षणे असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर नवी मुंबईतील नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालायात उपचार करण्यात येत आहेत. यासाठी पोलीस दलाने रुग्णालयाशी करारही केला आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ या सर्वांच्या आरोग्याचा दैनंदिन आढावा घेत आहेत.
Check Also
दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी …