नागोठणे : प्रतिनिधी
येथील रिलायन्स कंपनीतील कर्मचार्यांचा वेतनवाढ करार ऑक्टोबर 2018पासून प्रलंबित होता. सहा कामगार संघटनांची एकत्रितपणे प्रतिनिधित्व करणारी जॉईंट निगोशिएशन फोरमच्या माध्यमातून रिलायन्स व्यवस्थापनाशी बोलणी करीत होते. 11 जानेवारी रोजी आम्हाला यश आले असून रिलायन्सचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, धनंजय चौगुले, चेतन वाळंज, विनय किर्लोस्कर, नेत्रानंद स्वेन,निलेश दांडेकर, उदय दिवेकर आदी वरिष्ठ अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या दिवशी हा प्रलंबित करार पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याचे कामगार नेते सादुराम मालुसरे यांनी शुक्रवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पेट्रोकेमिकल्स एम्प्लॉईज युनियन, कोकण श्रमिक संघ, भारतीय कामगार सेना, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना आदी सहा संघटनांची एकत्र अशी जॉईंट निगोशिएशन फोरम नामक संघटना कार्यरत असून या फोरमचे मुख्य नेते सादुराम मालुसरे यांनी शुक्रवारी रिलायन्स निवासी संकुलातील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.
या करारात मूळ वेतनात सरासरी 38टक्के वाढ, प्रतिवर्षी 2.7 टक्के दराने वार्षिक पगारवाढ, एआयसीपीआयप्रमाणे महागाईभत्ता, दरमहा दोन हजार 750 रुपयांची खाद्याची कुपन्स, निवृत्तीनंतर पुढील दोन वर्षे कामगारांना मेडिकल सुविधा, 60वर्षानंतर कामगार, कर्मचारी व त्याच्या पत्नीला प्रत्येकी पाच लाख रुपयांची वैद्यकीय उपचार विमा आदींची तरतूद आहे. या वेतनवाढ करारामुळे प्रत्येकाला एरिअर्स रूपाने अडीच लाख ते साडेचार लाख रुपये मिळणार आहेत. निवृत्त होत असताना आकर्षक दराने निवृत्ती पॅकेज, प्रतिवर्षी 61हजार रुपयांचा बोनस तसेच पूर्वीच्या सर्व सेवाशर्ती व सवलती कायम ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.