नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या वतीने वारकरी संत परंपरेवर आधारित चित्ररथ या वर्षी प्रजासत्ताक दिनी होणार्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथाची बांधणी पूर्ण झाली असून, चित्ररथासोबत सहभागी होणार्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आठ फुट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. या मूर्तीसमोर ज्ञानेश्वरी ग्रंथ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारीत ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी आठ फुट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या पाठोपाठ राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणार्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी या चित्ररथावरील 8.5 फट उंचीची लोभस मूर्ती आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात आठ फुट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. वारकर्यांच्या वेषात मृदंग, टाळ व विणाधारी चार कलाकार चित्ररथावर प्रस्तुती देणार आहेत. याशिवाय चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी चार कलाकार वारकर्यांच्या भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे चित्ररथ सजीव वाटेल.