खेळाडू, क्रीडारसिक घेणार लाभ -लोकनेते रामशेठ ठाकूर
उलवे नोड : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने 23, 24 व 25 जानेवारीला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे भव्य दिव्य आयोजन उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 17) उलवा नोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, मागील वर्षी महाराष्ट्रात झालेल्या नमो चषक स्पर्धेत संपूर्ण राज्यातून पनवेलने चौथा क्रमांक पटकावला होता. त्या अनुषंगाने उत्कृष्ट आयोजन आणि नियोजनाचा फायदा या नमो चषक स्पर्धेला होणार आहे. या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडाफेक या अॅथलेटीक्स स्पर्धा होणार आहेत. शरीरसौष्ठव स्पर्धा फक्त पुरुष गटात व वजनी प्रकारात होणार आहेत, तर कबड्डी, खो-खो आणि अॅथलेटीक्स स्पर्धा पुरुष व महिला गटात होतील. त्यामध्ये कबड्डी वजनी प्रकारात, तर खो-खो आणि अॅथलेटीक्स स्पर्धा वयोगटानुसार होणार आहेत. या नमो चषकात पाच हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार असून स्पर्धेचा लाखो क्रीडाप्रेमी लाभ घेतील, असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेतील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना सात लाख 56 हजार रुपये, खो-खोमधील एकूण विजेत्यांना एक लाख 43,200 रुपये, कबड्डी स्पर्धेतील मधील एकूण विजेत्यांना एक लाख 81 हजार रुपये, तर अॅथलेटीक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना चार लाख 11 हजार रुपये अशी एकूण तब्बल 14 लाख 91 हजार 200 रुपयांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची बक्षिसे आणि प्रवेश विनामूल्य हे या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. खेळ आणि खेळाडूंच्या अनुषंगाने परिपूर्ण काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत आहे. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या 17 समित्या गठीत करण्यात आल्या असून प्रत्येक समिती आपापली जबाबदारी पार पाडत आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
या नमो चषक स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
या वेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी माहिती देताना सांगितले की, मागील वर्षी नमो चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल विधानसभा मतदारसंघात 21 क्रीडा प्रकारात झालेल्या या स्पर्धेत एक लाख 13 हजार 278 स्पर्धकांनी सहभाग घेऊन पनवेलने महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला होता. त्याच अनुषंगाने यंदाही नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात करण्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. त्यानुसार स्पर्धा स्थळी जोरदार तयारी करण्यात आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.
या नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे 1 अध्यक्ष निलेश खारकर, उलवे 2 अध्यक्ष विजय घरत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या वेळी विनोद नाईक यांनी माहिती देताना, राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 23 जानेवारीला, कबड्डी 24, तर खो-खो 25 जानेवारीला आणि या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाशझोतात होणार असल्याचे सांगून धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडाफेक या अॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस दिवसा होणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
या पत्रकार परिषदेत बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे उभारण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टीबद्दल पत्रकारांना अवगत केले. त्यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करीत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी जवळ आल्याने या भागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या भागात उद्योग, राजकीय आणि सामाजिक संघटनांनी विशेष लक्ष दिले आहे. या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याची संकल्पना गव्हाण आणि उलवे विभागातील नागरिकांनी मांडली आहे. या स्मारकासाठी सिडकोकडे जमीन मागितली होती. ती जमीन सिडको देण्यास तयार झाली आहे. गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मुंबईच्या शिवाजी पार्कसारखे एक मैदान उलवे नोडमध्ये माझ्या म्हणजेच रामशेठ ठाकूर यांच्या नावाने निर्माण व्हावे असा प्रस्ताव काँग्रेस नेते महेंद्र घरत यांनी मांडला आणि त्याला काही ग्रामस्थांनी अनुमोदन दिले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासाठी सिडकोने जमीन देण्याचे कबूल केले आहे. या जमिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी जेवढापण खर्च येईल तो श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ करण्यास तयार आहे. यासाठी 25 ते 30 कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही मी दर्शवली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी तसेच संमेलने, राजकीय सभा, सांस्कृतिक महोत्सव व अन्य कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणारे हे भव्य मैदान नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे. अश्वारूढ पुतळयासाठी साधारण एक एकर जमीन सिडकोने राखीव ठेवली आहे, तर मैदानासाठी पाच एकरचा भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. सामाजिक कार्यासाठी संस्था संघटनांना नाममात्र शुल्कात भूखंड सिडकोकडून दिले जाते. त्याच धर्तीवर ही जमीन सामाजिक कार्यासाठी नाममात्र दरात मिळावी. खरेतर प्रकल्पग्रस्त उभारत असलेल्या प्रकल्पाला सिडकोने जमीन मोफत द्यायला हवी. शेतकर्यांकडून 15 हजार रुपये एकरी या भावाने सिडकोने त्या वेळी जमीन खरेदी केली आहे, मात्र आता त्याच एकरसाठी जवळपास पाच कोटींच्या वर रक्कम भरण्यास सिडकोकडून सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून ते यामध्ये लक्ष घालतील आणि या ठिकाणी शिवाजी पार्कप्रमाणे आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारली जाईल. यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील, पण या सर्व वास्तूंचा ताबा अधिकार गव्हाण ग्रामपंचातीकडे राहील, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी अधोरेखित केले.