Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; गव्हाण येथे तोडक कारवाईसाठीआलेले सिडकाचे पथक माघारी

पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी
(दि. 17) सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाई करण्यासाठी आला असता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे सिडकोच्या पथकाला नरमाईची पत्करत माघारी फिरावे लागले.
उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोचा अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाई करण्यासाठी आल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मिळताच त्यांनी आपली स्वत:ची कामे बाजूला ठेवून ते शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांसोबत गव्हाण गावात पोहचले. गव्हाण ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सदस्य हेमंत पाटील, महेश पाटील, सचिन कोळी यांनी केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यासाठी पथक आले होते. सिडको जोपर्यंत तोडक कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा इशारा यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिडकोच्या अधिकार्‍यांना नमते घेत कारवाई थांबवावी लागली.
यानंतर भाजपच्या गव्हाण येथील कार्यालयात सिडको अधिकार्‍यांसोबत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत येत्या दोन ते तीन दिवसात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासोबत सिडको अधिकार्‍यांची बैठक होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन केले जाईल. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई सिडकोने करू नये, असा निर्णय झाला असल्याची माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. या बैठकीत झालेल्या निर्णयाला सिडकोच्या अधिकार्‍यांनीही सहमती दर्शवली आहे.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, प्रितम म्हात्रे, हेमंत ठाकूर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, अमर म्हात्रे, सचिन घरत, जयवंत देशमुख, वसंत म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, सिडको अधिकार्‍यांचा कारभार हा भोंगळ असल्याचा शिक्का प्रकल्पग्रस्तांनी ठेवला आहे. शासनाने विविध वेळा प्रकल्पग्रस्तांना आश्वासने दिली की, 250 मिटरपर्यंतची घरे नियमित करणार, मात्र अजूनही सिडकोचे अधिकारी हे तोडक कारवाया करतच आहेत.
मी अनेक वर्षापासून शासनाकडे प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी पाठपुरावा करत असून सिडकोला सतत सांगत आलोय तुम्ही गावाच्या भोवती रिंग रोड बनवला पाहिजे, पण या कामात सिडकोने सतत चालढकलपणा केल्यामुळे आज ही वेळ प्रकल्पग्रस्तांवर आली आहे, सांगून सिडकोच्या कारभारावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply