नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुलवामामधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणार्या आणि आयएसआयशी कनेक्शन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. केंद्र सरकारने मीरवाइज उमर फारूखसह अब्दुल गनी बट्ट, हाशिम कुरैशी, बिलाल लोन आणि शब्बीर शाह या पाच फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. शिवाय त्यांना देण्यात येणार्या सरकारी गाड्याही काढून घेतल्या जाणार आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या इशार्यावर काम करणार्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेणार असल्याचे स्पष्ट केले होते, तसेच आयएसआयशी संबंधित असलेल्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेशही त्यांनी यंत्रणेला दिले होते.
केंद्र सरकारच्या या आदेशानंतर जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवाने या फुटीरतावादी नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन या पाचही फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. या फुटीरतावाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी संरक्षण दिले होते.