Breaking News

आरोपीने घातक हत्यारे फेकली वसईच्या खाडीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरने गौरी लंकेश यांचा खून करण्यासाठी वापरलेली हत्यारे नष्ट करून वसईच्या खाडीत फेकल्याची कथित माहिती कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोर्टात सादर केली आहे. सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात कळसकरचे नाव जोडले आहे. 2017मध्ये गौरी लंकेश यांच्यावर त्यांच्या बेंगळूरूमधील निवासस्थानाबाहेर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

बेंगळूरूच्या विशेष तपास पथकाने बेंगळूरू कोर्टात नोव्हेंबर 2018मध्ये सादर केलेल्या कागदपत्रांनुसार डॉ. दाभोलकर खूनप्रकरणी सीबीआयने कळसकरला ताब्यात घेतल्यानंतर दोनच महिन्यांच्या कालावधीत गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेंगळूरू एसआयटीने कळसकरला अटक केली. गौरी लंकेश यांना मारण्यासाठी वापरलेली पिस्तुले नष्ट करून मुंबई-नाशिक महामार्गालगत वसईच्या खाडीत ज्या ठिकाणी फेकली ते ठिकाण कळसकरने 6 ऑक्टोबर 2018 या दिवशी एसआयटीच्या अधिकार्‍यांना दाखवले, अशी माहिती बेंगळूरू एसआयटीने कोर्टाला दिली. सीबीआयनेही कळसकरने मुंबईत जुलै महिन्यात पुलावरून हत्यारे फेकली, अशी माहिती पुणे कोर्टात दिली होती. यामुळे एसआयटीने सादर केलेल्या माहितीला बळ मिळते. गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रात 18 आरोपींपैकी एक असलेल्या कळसकरने या प्रकरणातील संशयित परशुराम वाघमारे व इतरांना हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचाही कळसकरवर आरोप आहे. गौरी लंकेश यांची हत्या करण्यापूर्वी वाघमारे आणि सहकार्‍यांनी लंकेश यांच्या घराची पाहणी केल्याची माहिती सीबीआयने कोर्टात सादर केली आहे. गौरी लंकेश हत्येतील आरोपींवर मार्क्सवादी नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा संशय आहे. कर्नाटकातील जंगलात आढळलेल्या काडतुसांवरून तिथे वापरण्यात आलेल्या पिस्तुलांपैकी दोन पिस्तुलांचा वापर पानसरे यांची हत्या करण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याची एसआयटीची माहिती आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply