Breaking News

अस्वस्थ प्रजासत्ताक दिन

शेतकर्‍यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतात. म्हणूनच शेतकरी नेत्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दहापेक्षा जास्त वेळा सकारात्मक चर्चा केली. ज्या तीन कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे, ते कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचीही तयारी दर्शवली. शेतकरी नेत्यांनी खरे तर आंदोलन आटोपते घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांचा उद्रेक सत्ताधार्‍यांनी जसा समजून घ्यायला हवा तसेच तारतम्य आंदोलनाच्या नेत्यांनी देखील दाखवायला हवे.

ऐन प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर राजधानी दिल्लीतील किसान आंदोलनाला गालबोट लागले. गेले 62 दिवस शांततापूर्ण रीतीने दिल्लीच्या सरहद्दीवर हरयाणा व पंजाबमधील शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू ठेवले होते. त्याला हिंसक वळण प्रजासत्ताक दिनीच मिळावे ही दुर्दैवाची बाब आहे. लाल किल्ल्याच्या बुरुजावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत असतो, तेथे काही उपद्रवी समाजकंटकांनी वेगळाच झेंडा लावला. शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचे मार्ग हेतूपुरस्सर बदलण्यात आले. काही ठिकाणी जमाव अतिशय हिंसक बनला. पोलिस मोठ्या संख्येने जखमी झाले. वाहने व अन्य सार्वजनिक मालमत्तेचा चक्काचूर झाला. तरीही ज्या संयमाने दिल्ली पोलिस व केंद्र सरकारने परिस्थिती हाताळली त्याला दाद दिली पाहिजे. शेतामध्ये राबणारा आपला शेतकरी बांधव भाबडा असतो, आपल्या समस्यांबाबत क्वचितप्रसंगी उग्र रूप धारणही करतो. उदाहरणार्थ कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइन संबंधात गेल्या दोन वर्षांत एक नवा पैसा देखील भरपाई न मिळालेल्या शेतकर्‍यांनी प्रजासत्ताक दिनीच उद्रेक आंदोलन छेडले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. याप्रसंगी रिलायन्सची पाइपलाइन उखडण्यासाठी जमलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटकाव केला. आमदार प्रशांत ठाकूर यांना धक्काबुक्की होत असल्याचे ध्यानात आल्याने जमलेले शेतकरी संतापले व परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सक्षम अधिकारी नेमून या प्रश्नाची लवकरात लवकर तड लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. अशाप्रकारचेच तारतम्य कुठल्याही प्रकारच्या आंदोलनात अपेक्षित असते. दुर्दैवाने दिल्लीतील शेतकरी आंदोलन नेत्यांच्या हातून कधी निसटलेे ते त्यांना देखील कळले नाही. या आंदोलनामध्ये काही उपद्रवी तत्त्वे शिरकाव करत असल्याचे गोपनीय अहवाल सरकारकडे येत होते असे आता सांगितले जात आहे. तशाप्रकारची कल्पना दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना देखील दिली होती. परंतु आंदोलन हायजॅक करणार्‍या उपद्रवींनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला. त्यामुळे संपूर्ण आंदोलनच बदनाम झाले. आंदोलन छेडणार्‍या संयुक्त किसान मोर्चामध्ये आता उभी फूट पडली आहे. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या दोन महत्त्वाच्या संघटना घरी परतण्याची भाषा करू लागल्या आहेत. दिल्लीकरांना छळण्यासाठी किंवा तिरंग्याचा अपमान करण्यासाठी आम्ही येथे आलो नव्हतो. आमच्या आंदोलनाला चुकीचे वळण लागले अशी कबुली या शेतकरी नेत्यांनी आपल्यापुरते आंदोलन स्थगित करताना दिली. प्रजासत्ताक दिनीच हे सारे घडल्याचे दु:ख प्रत्येक भारतीय मनाला वाटत असेल. दिल्लीतील हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्यांना कायद्याच्या बडग्याला सामोरे जावे लागेल यात शंका नाही. परंतु जे घडले ते अतिशय क्लेशदायक आहे हे मात्र नक्की. प्रजासत्ताक दिनाचे शानदार संचलन बघताना सकाळी सर्वांची मान अभिमानाने उंचावली होती. दुपारनंतरच्या हिंसाचारामुळे ती शरमेने खाली झुकली असेल.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply