Breaking News

उरणमध्ये महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ

उरण : प्रतिनिधी

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी उरणमध्ये महाविकास आघाडीला नगरपरिषद निवडणुकीचे डोहाळे आताच लागले आहेत. उरण शहरात नसलेली ताकद आजमावण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी शनिवारी (दि. 21) मोठा गाजावाजा करीत बोलावलेली पत्रकार परिषद नियोजित वेळेपेक्षा दोन तासांच्या कालावधीनंतरही सुरू न केल्याने येथील पत्रकारांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यात नगरपरिषद निवडणुकांचा फड रंगण्याची शक्यता आहे, मात्र कोरोनाच्या काळामुळे राज्य सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय अजूनही जाहीर केला नाही.

उरणमधील ‘मविआ’च्या नेत्यांना आपल्या नातेवाईकांना नगरसेवक तसेच नगराध्यक्ष बनविण्याची स्वप्ने स्वस्थ बसू देत नसल्याने उरण शहरात ताकद नसलेल्या नेत्यांनी आतापासूनच आपली बोथड राजकीय अवजारांचा गंज काढण्याची तयारी सुरू केली आहे. उरण नगर परिषदेवर एक हाती सत्ता असलेल्या भाजपला आव्हान देण्याच्या फुसक्या तुतारी फुंकण्यासाठी मविआच्या पुढार्‍यांनी आज शामियाना हॉटेलमध्ये एक भव्य बैठक बोलावली होती.

या बैठकीला हाताच्या बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते उपस्थित होते. या मिटिंगनंतर महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये आ. बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत आपले राजकीय डावपेज सांगण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची लंबिचौडी भाषणे सुरू झाली.वस्तुतः महाविकास आघाडीमधील शिवसेना व्यतिरिक्त एकाही पक्षाचा उरण शहरात एक नगरसेवक निवडून आणण्याची ताकद नसताना त्यांचे फुसके राजकीय डावपेज ऐकून शहरातील एका क्रियाशील पुढार्‍यांनी संताप व्यक्त केला.

उरण शहरात भाजपने आपल्या विकास कामांच्या माध्यमातून मोठी ताकद निर्माण केली आहे. आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहराचा झपाट्याने विकास होत आहे.त्यामुळे शहरातील शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे शहरातील अनेक कार्यकर्ते आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात उठबस करीत असतात. त्यामुळे शिवसेना वगळता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना नगरपरिषदेसाठी उमेदवार मिळणे मुश्किल होणार आहे. भाजपने मिळवलेल्या या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीच्या पुढार्‍यांनी लवकरच आपल्या गंजलेल्या  राजकीय आयुधांना आताच धार लावायला सुरुवात केली आहे.

त्यापैकी कोणाला आपल्या नातेवाईकाला नगराध्यक्ष बनवायचे आहे, तर कोणाला आपल्या प्रिय व्यक्तीला नगरसेवक बनवायचे आहे, मात्र या तयारीची चर्चा करताना त्यांनी आयोजित करलेल्या पत्रकार परिषदेचे भान त्यांना राहिले नसल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांना त्यांनी सुमारे दीड ते दोन तास ताटकळत ठेवले. त्यामुळे पत्रकारांनी महाविकास आघाडीच्या या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करीत पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

उरण नगरपरिषद निवडणूक जेव्हा होईल, तेव्हा होईल. भाजप महाभकास आघाडीला कधीच आव्हान मानीत नाही. भाजपने उरण शहराचा विकास केला असून यापुढेही जनतेच्या विकासाचे पर्व सुरूच राहणार आहे. येणार्‍या निवडणुकीत भाजप शंभर टक्के यश संपादन करील यात तिळमात्र शंका नाही.

-कौशिक शहा, शहराध्यक्ष, भाजप, उरण

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply