पनवेल : रामप्रहर वृत्त
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका ज्योती मोहन शिरसाट (प्रथम वर्ष-कला शाखा) हिने द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेने आयोजित केली होती. ज्योती हिने स्पर्धेसाठी सुचविलेल्या विषयांपैकी पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत सावित्रीबाई फुले या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण निबंधाद्वारे केले. या स्पर्धेतून मला खूप काही शिकायला मिळाले, आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याचे मला पुन्हा एकदा स्मरण झाले, असे ज्योती हिने सांगितले. महाविद्यालयाचे इंग्रजी विभागाचे प्राध्यापक सूर्यकांत परकाळे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवण्यात यश आले, असे बोलून स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणार्या व मार्गदर्शन करणार्या सर्वांचे आभार मानले.
या यशाबद्दल समाजकल्याण रायगड जिल्ह्याचे सहआयुक्त सुनील जाधव यांच्या हस्ते तिला प्रशस्तिपत्रक व रोख पाच हजाराचे बक्षीस देण्यात आले. ते देत असताना त्यांनी सीकेटी. महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनीचे खूप कौतुक केले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे यांनी प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले.
तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी डी. आघाव, मराठी विभागप्रमुख प्रा. एम. एम. कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी शुभेच्छा दिल्या.