गुढीपाडवा सणावर विरजण, उकाड्याने ग्रामस्थ हैराण
पाली : प्रतिनिधी : वीजवाहिन्या तुटल्याने शनिवारी (दि. 6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पालीतील वीजपुरवठा खंडित झाला, तो रविवारी (दि. 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हणजे तब्बल 15 तासांनी पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गुढीपाडवा या सणाच्या दिवशीच वीजबत्ती गुल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
कानसई अतीउच्चदाब उपकेंद्रातून पालीला विद्युत पुरवठा करणार्या वीजवाहिन्या चार ठिकाणी तुटल्यामुळे पालीतील वीज 15 तास गायब होती. वीज कर्मचारी रात्रभर दुरुस्तीचे काम करत होते. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि आणि एसी ही उपकरणे कुचकामी ठरली. अनेकांच्या इन्व्हर्टरमधील ऊर्जादेखील संपली. परिणामी ऐन गर्मीमध्ये रात्री सर्वच पालीकरांची झोपमोड झाली. शनिवारी गुढीपाडवा होता. संध्याकाळीच वीजपुरवठा खंडित झाल्याने उत्सव व शोभायात्रेसाठी निघालेल्या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.
वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने रात्रभर सर्व कर्मचार्यांसोबत बिघाड शोधत होतो. चार ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या होत्या, त्यामुळे दुरुस्ती करण्यास वेळ गेला. अथक परिश्रमानंतर वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. -गोविंद बोईने, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, पाली
वीजपुरवठा खंडित झाल्याने विशेषत: छोट्या मुलांचे अधिक हाल झाले. गर्मीमुळे रात्रभर झोप दुरापास्त झाली. सामान्य नागरिकांना वीज का गेली व कधी येईल हे माहीत नसल्याने हकनाक विजेची वाट पाहावी लागली. -भीम महाडिक, ग्रामस्थ, पाली, ता. सुधागड