Breaking News

कर्जत नगरपालिकेने तोडले रेल्वेचे पाणी

वाढीव पाणीपट्टी देण्यास रेल्वेकडून विरोध

कर्जत : बातमीदार : दररोज दोन लाखहून अधिक लिटर पाणी घेणार्‍या मध्य रेल्वेकडून कर्जत नगरपालिकेला हवे तसे उत्पन्न मिळत नाही. वाढीव पाणीपट्टी मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा केला गेला, मात्र रेल्वे ऐकत नसल्याने अखेर शनिवारी (दि. 6) पासून नगरपालिकेने कर्जत रेल्वेस्टेशन आणि तेथील रेल्वे वसाहतींचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

रेल्वेने आपल्यासाठी पळसदरी येथे धरण बांधून स्वतःचे पाणी उपलब्ध केले होते. तेच पाणी पुढे कर्जत ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत विकत घेत होती. कर्जत नगरपालिका स्थापन झाली आणि तत्कालीन युती सरकारच्या काळात कर्जत शहरासाठी पेज नदीची नळपाणी योजना प्रत्यक्षात आली. नगरपालिकेच्या या पाणी योजनतूनच कर्जत रेल्वे स्टेशन व रेल्वे वसाहतींना पाणीपुरवठा होऊ लागल्याने पळसदरी धरणाचे पाणी पडून आहे, मात्र नगरपालिकेचे पाणी घेणार्‍या कर्जत रेल्वे स्थानक आणि कामगार वसाहत यांची पाणीपट्टी रेल्वे देत नव्हती. 2013 पासून तर रेल्वेकडून किती पाणी वापरले जाते, याबाबत रेल्वेकडून मोजमापदेखील घेतले जात नव्हते. साधारण दोन लाख लिटर पाणी वापरणार्‍या कर्जत रेल्वेकडून पाणीपट्टी दिली जात नव्हती. दरम्यान, वाढीव पाणीपट्टी मिळावी, यासाठी कर्जत नगरपालिकेने रेल्वेकडे पत्रव्यवहार केला. वर्षाला 40 लाखाचे पाणीपट्टी देणार्‍या रेल्वेकडून कर्जत नगरपालिकेला 90 लाख पाणीपट्टी मिळाली पाहिजे यावर एकमत झाले होते, मात्र पाणीपट्टीची रक्कम मिळाली नाही, त्यामुळे नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनचा पाणीपुरवठा बंद केला. कर्जत रेल्वे स्टेशन, तसेच चार रेल्वे कामगार वसाहतीमधील 100 हून अधिक खोल्यांचे पाणी बंद केले गेले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असून, आतातरी पाणीपट्टीची रक्कम नगरपालिकेला मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

2013 पासून रेल्वेने नवीन दराने पाणीपट्टी दिली नाही, यापूर्वी नगरपालिकेने पाठविलेली, नवीन दराने पाणीपट्टी लावून घ्यावी, अशी विनंती पत्रे रेल्वेने स्वीकारली नाहीत. स्थानिक सर्व नागरिकांना पाणीपट्टीसाठी अधिक दर आकारले जात असून रेल्वेला सूट का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असल्याने ही कार्यवाही करण्यात आली. -रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगर परिषद

कर्जत नगरपालिकेचा नवीन दराच्या पाणीपट्टीचा प्रस्ताव रेल्वेकडे आला आहे, आम्ही त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. -अजय रॉय, उपअभियंता,मध्य रेल्वे, कल्याण विभाग

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply