Breaking News

दिघी बंदराच्या विकासाला लवकरच येणार वेग

दिघी बंदराचा विकास हा आगरदांडा बंदरसमवेत कऱण्यात येणार होता. परंतु आगरदांडा बंदर विकासापासून खूप दूर राहिले. अनेक वर्ष काम बंद राहिल्याने आगरदांडा येथे ठेवलेली सर्व यंत्रसामुग्री गंजून गेली. तर गेल्या अनेक वर्षांपासून दिघी बंदराच्या विकासाचे काम रखडले होते. मात्र आता दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी बंदराच्या विकासासाठी 10हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता या बंदराच्या विकासाला वेग प्राप्त होणार आहे. जेएनपीटी बंदरातील गर्दी काही अंशी कमी करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी जेएनपीटीच्या धर्तीवर दिघी बंदराचा विकास करण्यात येणार आहे. 

दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीचे विकासक विजय कलंत्री यांनी अनेक बँकेतून कर्ज घेऊन दिघी बंदर विकासाच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र कर्ज वेळेत न फेडल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. दिघी पोर्टचा ताबा एकहाती मिळवण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे सदरचा वाद सुरु होता. त्याचा  निकाल अदानी ग्रुपच्या बाजूने लागल्याने एकमार्गी दिघी बंदर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अदानी समूहातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमी झोन या बंदर व विशेष आर्थिक क्षेत्र कंपनीने दिघी बंदर 705कोटी रुपयांना ताब्यात घेत असून बंदराच्या विकासासाठी 10 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. देशातील बारा महत्वाच्या बंदरापैकी जेएनपीटी हे बंदर एक नंबर आहे. दिघी बंदराचा विकास जेएनपीटीच्या बंदरासारखाच करणार असून, माल वाहतूक हाताळणीचे पर्यायी केंद्र म्हणून दिघी बंदर विकसित करणार असल्याची घोषणा आदानी ग्रुपकडून करण्यात आल्याने आर्थिक घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे.

सदर प्रकल्पच्या विकासाला वेग आल्याने सुमारे 2500पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. यांचा फायदा  स्थानिकांना होणार आहे. स्थानिक  विद्यार्थ्यांनी  मटेरिअल मॅनेजमेंट, मर्चट नेव्ही, मरिन फिटर, डिझेल मेकॅनिकल व इतर कोर्सेंस करून त्याची सर्टिफिकेटस मिळावावीत, जेणे करून त्यांना या कंपनीत रोजगार मिळू शकणार आहे. बंदराचे काम झपाट्याने पूर्ण करून विविध विभागाची भरतीसुद्धा करण्यात येणार आहे.

काँक्रिटचा रस्ता हा बंदर विकासाचा पहिला टप्पा पार पडत आहे. दुसर्‍या टप्प्यात आगरदांडा ते रोहा  रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार आहे, तो टप्पा काही दिवसातच कार्यान्वित करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे.

 गौतम अदानी यांचा बंदर विकासाचा अनुभव दांडगा असून त्यांनी भारत तसेच परदेशात मोक्याच्या ठिकाणी बंदर विकसित केली आहेत. रखडलेल्या बाबी पूर्ण करून ते दिघी बंदराचा विकास करणार आहेत. या विकासामुळे मुरुड व श्रीवर्धन तालुक्यांना मोठे महत्व प्राप्त होऊन या परिसरात आद्योगिकरण झपाट्याने वाढणार आहे.

या बंदरासाठी आगरदांडा व दिघी परिसरातील  1600एकर जमीन घेण्यात आली आहे. हे बंदर फ्रेट कॉरिडोरचाही एक भाग असून ते लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे  यासाठी  बंदर विभागाचे प्रयत्न आहेत.सध्या दिघी बंदरात मोठंमोठी जहाजे फार तुरळकच येत आहेत. आगरदांडा बंदर अदानी यांनी घेतल्यामुळे  तेथील  रखडलेल्या कामाला आता वेग प्राप्त होऊन सदरच्या भागाचे औद्योगिकीकरण लवकरात लवकर होणार आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

शिवसेना ‘उबाठा’चे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना …

Leave a Reply