नवी मुंबईत कोरोनाबळींमध्ये 80 टक्के पन्नाशीच्या पुढील; तरुणांनाही धोका
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवी मुंबईत प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत. 80 टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा आकडा 1023 एवढा आहे. तरुणांमध्येही मृत्यूचा धोका वाढत असून आतापर्यंत तब्बल 100 तरुणांचा मृत्यू झाला आहे. 10 वर्षांच्या आतील दोन जणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये आतापर्यंत 1268 जणांचा मृत्यू झाला आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता असल्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मृत्युदर रोखण्यावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वयोगटानुसार मृत्युदराचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणारांचा सर्वाधिक समावेश आहे. एकूण मृत्यूपैकी 80 टक्के पन्नाशीच्या पुढील असल्याचे निदर्शनास आले आहे. 40 ते 50 वयोगटांतील 143 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 ते 60 वयोगटांतील 316 जणांचा व 60 ते 70 वयोगटातील 364 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 ते 80 वयोगटातील 249 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 ते 100 वयोगटातील 94 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 11 ते 40 वयोगटातील 100 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व वेळेत चाचणी करून उपचार सुरू न केल्यामुळे अनेक तरुणांचा मृत्यू होत आहे.
विशेष लक्ष देण्यास सुरुवात
ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पन्नाशीच्या पुढील सर्व रुग्ण मनपाच्या निगराणीखाली असणार आहेत. त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख केली जाणार असून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तरुणांमध्येही मृत्यूचे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखे नाही.
आबानंद वृद्धाश्रमातील 61 पैकी 56 जणांना कोरोनाची लागण; दोघांचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर
तळोजा परिसरात असलेल्या परमशांतीधाम वृद्धाश्रमातील 56 जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
तळोजातील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील 61 वृद्ध व सात कर्मचारी असे एकूण 68 पैकी 58 जण बाधित झाले होते. त्यातील दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पनवेल परिसरात झपाट्याने पसरत आहे. याबाबत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे. लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने करोनाची चाचणी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन किंवा वैद्यकीय मोबाइल व्हॅनला कळवून करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
तळोजा परिसरातील वृद्धाश्रमात 68 पैकी 56 जणांना करोनाची लागण झाली असून यातील 14 जण गंभीर असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांची पालिका काळजी घेत आहे, मात्र या प्रकारामुळे परिसरात कोरोना संसर्ग किती झपाट्याने पसरत आहे, हे लक्षात येत आहे. पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्हा वैद्यकीय कार्यालय हे सर्वजण पनवेल परिसरातील वृद्धाश्रमाची पाहणी व माहिती घेत आहेत.
दरम्यान, खारघरमधील रुग्णसंख्या जास्त असल्याने तेथे चार वैद्यकीय मोबाइल व्हॅन ठेवल्या आहेत. पालिकेच्या इतर परिसरात सहा वैद्यकीय मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना घरापर्यंत वैद्यकीय सेवा दिली जात आहे.