Breaking News

कोरोनाबाधितांसाठी नवी मुंबईत हॉस्पिटल उभारा -आमदार मंदा म्हात्रे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर   नवी मुंबई क्षेत्रात भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल उभारण्याकरिता प्रशासनातील सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात आमदार म्हात्रे यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशात कोरोनासारख्या भयंकर आजाराने थैमान घातले असताना नवी मुंबई क्षेत्रातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक हजारोंच्या संख्येने वाढत आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातही उपचाराकरिता बेड्स उपलब्ध होत नाहीत. नवी मुंबई महापालिका व सिडको यांच्या माध्यमातून कोविड सेंटर उपलब्ध करण्यात आलेले आहेत, परंतु तेही अपुरे पडत आहेत.

ठाणे, कल्याण, उरण, पनवेल, कर्जत, खोपोली तालुक्यातील रुग्णही उपचाराकरिता नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील स्थानिक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने उपचाराविना मृत्यू होण्याची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा कहर पाहता यापुढेही अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवी मुंबईसारख्या विकसित शहरात अशा परिस्थितीचा सामना करण्याकरिता योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोना हा आजार संपूर्ण नष्ट होण्यास किती काळ जाईल हे अजूनही अस्पष्ट आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नवी मुंबईमध्ये भव्य,सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल उभारल्यास यापुढील येणार्‍या संकटाचा सामना आपण करू शकतो.

सिडको महामंडळाकडे बेलापूर विधानसभा क्षेत्रात अनेक भूखंड विनावापर पडून आहेत. त्यामुळे या भूखंडांवर अतिक्रमण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यापैकी एखादा मोठा भूखंड हॉस्पिटलकरिता आरक्षित करून भव्य हॉस्पिटल उभारल्यास कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर मात करता येईल.

नवी मुंबईत भव्य, सुसज्ज व सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे हॉस्पिटल उभारण्यासाठी आपल्या इच्छाशक्तीने लक्ष घालून आरोग्य मंत्री, नगरविकास मंत्री, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित केल्यास हॉस्पिटल उभारण्याची कार्यवाही करणे सोयीचे होईल, असे आमदार मंदा म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply