धाटाव : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील वाशी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन कल्याणचे माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रभारी निवृत्ती पवार यांनी येथे दिले.
वाशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गावविकास आघाडी केली आहे. या आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवारांच्या प्रचाराची आढावा बैठक भाजपाचे धाटाव विभाग अध्यक्ष बामणे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी गावातील तरूण, महिलांनी गावातील समस्या मांडल्या. स्मशानभूमीतील शेडची मागणी करण्यात आली. गावचा विकास करणार्यांच्या पाठिशी उभे राहून प्रभाग क्रमांक तीनमधील आघाडीच्या तीनही उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही या वेळी उपस्थित मतदारांनी दिली.
या गाव बैठक आढावा बैठकीस माजी आमदार निवृत्ती पवार, भाजप नेते राजेश मापारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, चंद्रकांत घोसाळकर, विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, सुनिल सुतार, प्रकाश सुतार, रवी मोरे, विकास जोगडे, आघाडीचे उमेदवार, भाजप पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.