वार्सा ः वृत्तसंस्था
पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडू गितिका, अरुंधती चौधरी, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, सानामचा चानू, विन्का आणि अल्फिया पठाण या सात जणींनी सुवर्णपदकावर नाव कोरले. सात सुवर्णांसह भारताने 2017च्या हंगामातील कामगिरीला मागे टाकले. त्या वेळी भारतीय महिलांनी तीन सुवर्णपदक मिळवले होते.
महिलांच्या 48 किलो वजनी गटात गितिकाने पोलंडच्या नतालिया कुझेव्हस्कावर 5-0 असा विजय मिळवला. आशियाई विजेत्या बेबीरोजिस्नाने रशियाच्या व्हॅलेरिया लिंकोव्हाला 5-0 अशी धूळ चारून 51 किलो वजनी गटाचे जेतेपद मिळवले. सानामचाने (75) किलो) कझाकस्तानच्या दाना दिदायवर 5-0 असे वर्चस्व गाजवले. अरुंधतीने (69 किलो) पोलंडच्या बार्बोरा मार्किनकोव्हस्काला 5-0 असे नमवले. पूनमने फ्रान्सच्या स्टेलीन ग्रोसीवर 5-0 अशी मात करून 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली, तर विन्काने (60 किलो) अंतिम फेरीच्या सुरुवातीलाच कझाकस्तानच्या हुल्डी शायाकमेटोव्हावर जोरदार प्रहार करून तिला सामन्यातून माघार घेण्यास भाग पाडले. अल्फियाने (81+) मोल्डोव्हाच्या दारिया कोझोरेझला 5-0 असे नामोहरम केले.