रोम ः वृत्तसंस्था
युरोपियन फुटबॉलमध्ये बंडखोरी करून सुपर लीगच्या आयोजनाचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. इटलीतील फुटबॉल क्लब्जनी माघार घेण्यापूर्वी सुरुवातीला या स्पर्धेच्या आयोजनाला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता होती, मात्र इटालियन फुटबॉल महासंघाने त्यांना कोणतीही शिक्षा सुनावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लिव्हरपूल, अॅटलेटिको माद्रिद, आर्सेनल, चेल्सी, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी आणि टॉटेनहॅम हॉटस्पर या संघांनी या लीगमधून माघार घेतली. त्यानंतर युव्हेंटस, एसी मिलान आणि इंटर मिलान या इटलीतील क्लब्जनीसुद्धा या लीगला नकार दर्शवला. त्यामुळे बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद हे दोनच संघ शिल्लक राहिले आहेत.
‘इटलीतील फुटबॉल क्लब्जनी सुपर लीगच्या आयोजनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता, परंतु या लीगला गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे इटलीतील क्लबवर आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही,’ असे महासंघाचे अध्यक्ष गॅब्रिएल ग्रॅव्हिना म्हणाले.
मँचेस्टर युनायटेडच्या सरावादरम्यान निदर्शने
मँचेस्टर : मँचेस्टर युनायटेडने सुपर लीगमधून माघार घेतली असली तरी त्यांच्या सराव सत्रादरम्यान ओल्ड ट्रॅफोर्ड येथील स्टेडियमबाहेर काही फुटबॉल चाहत्यांनी निदर्शने केली. ‘फुटबॉलला वाचवा’, ‘सुपर लीगची संकल्पना हद्दपार करा’, अशा आशयाचे फलक घेऊन चाहत्यांनी लीगला विरोध दर्शवला.