ठाणे ः प्रतिनिधी
ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात चार कोरोना रुग्णांचा सोमवारी (दि. 26) मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे, तर रुग्णालयाने हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या आक्रोशानंतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाच्या सखोल चौकशीची तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
ठाण्यातील वर्तकनगरमध्ये वेदांत हे खासगी कोविड रुग्णालय आहे. या रुग्णालयात सोमवारी सकाळी अचानक चार रुग्ण दगावले. या रुग्णांची प्रकृती ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने बिघडली आणि परिणामी त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. ऑक्सिजनअभावी आपला माणूस गमावल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले होते. त्यामुळे रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या वेळी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी आले. भाजपसोबतच मनसेचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.
दरम्यान, भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीकडून प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.
सखोल चौकशी करून कडक कारवाई करा : आमदार डावखरे
वेदांत रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाले यामागे रुग्णालय दोषी आहे की महापालिका प्रशासन या संदर्भातील जिल्हाधिकार्यांची भेट घेत आहोत. यासंबंधी सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर दोषींवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. ठाण्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना अशा प्रकारची घटना निषेधार्ह आहे. ज्यांचे निधन झाले आहे त्यांच्या नातेवाइकांकडून बिल घेतले जाऊ नये अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …