Breaking News

मोफत लसीकरणावरून श्रेयवाद

महाविकास आघाडीतील काँग्रेसची उघड नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने 1 मेपासून देशभरात 18 वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान अनेक राज्यांनी मोफत लसीकरण केले जाईल असे जाहीर केले असून, महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व महाविकास आघाडी सरकारमधील नवाब मलिक यांनी मात्र मोफत लसीकरणाची घोषणा केली. दुसरीकडे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विट केले होते, पण नंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केले. दरम्यान, काँग्रेस नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावरून नाराजी जाहीर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत लसीकरणाबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. अशातच राज्य सरकारकडून नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी म्हटले, तसेच यासाठी जागतिक टेंडर काढण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली, मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलिट केले आणि लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असे सांगितले.
यावरून महाआघाडीतील गोंधळ व मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसने तर आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे. मोफत लसीकरणावर आमची भूमिका स्पष्ट आहे. सोनिया गांधी यांनी तसे सांगितले असून, लस मोफत दिली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मुख्यमंत्री यावर विचार करीत असताना श्रेय घेण्यासाठी कोणी घोषणा करते हे आम्हाला आवडले नाही. काँग्रेस म्हणून आमची नाराजी आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण होणार असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील असमन्वयावरही बोट ठेवले आहे. त्याचप्रमाणे 1 तारखेपासून आपल्याला लसीकरणाची पद्धत बदलायला हवी. कारण आता मोठ्या संख्येने लोक यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण आखायला हवे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. 100 टक्के भारतीयाकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून, लसीकरण होणार आहे. आता वेगवेगळी वक्तव्ये का केली जात आहेत. ट्विट डिलिट का केली जात आहेत याची मला कल्पना नाही, पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे, असे सांगत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply