Breaking News

मिशन लसीकरण

महाराष्ट्रासह देशातील कोरोना संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याच्या घडीला तेच महत्त्वाचे आहे. 18 वर्षांवरील सर्व देशवासीयांचे आता लसीकरण होणार असून, इतर देशांकडून लसी येणे सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा देशाला जबरदस्त तडाखा बसला आहे. कोरोनाबाधित होणार्‍यांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. सध्या सरासरी साडेतीन ते चार लाख नवे रुग्ण देशात दिवसाला आढळून येत आहेत. यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे, तर मृतांची आकडेवारीही चिंता वाढविणारी आहे. दररोज सरासरी तीन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय. केवळ एप्रिल महिन्यातच देशात तब्बल 45 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची भीषण आकडेवारी समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्णवाढ आणि मृत्यू अशा दोन्हीतही दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी कायम आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. खरेतर हा एक प्रकारे लॉकडाऊनच आहे. राज्य सरकार कोरोनापुढे हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत लढायचे सोडून केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात राज्यातील शासनकर्ते धन्यता मानत आहेत, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे या संकटाचा मुकाबला करीत असून, देशातील नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि प्रयत्न करीत आहेत. मोदी सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. त्यानुसार 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. देशात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध असून, आता रशियाकडून स्पुटनिक व्ही या लसीची पहिली खेपही दाखल झाली आहे. ही लस सर्वाधिक प्रभावशाली मानली जाते. या लसीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार भारताचा जुना मित्र पुन्हा एकदा धावून आला आहे. याशिवाय अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युएई आदी देशांनी आतापर्यंत भारताला मदत करण्याचे धोरण जाहीर केले असून, त्यासाठी सक्रीय पुढाकारदेखील घेतला आहे. सध्याच्या घडीला कोरोनावर लसीकरण हा एकच उपाय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. म्हणूनच त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सुरुवातीला कोविड योद्ध्यांच्या लसीकरणास सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 60 वर्षांवरील नागरिक, मग 45 वर्षांवरील लोक आणि आता 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू झाले आहे. या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे, कारण या वयोगटातील नागरिकांची संख्या प्रचंड आहे. ते पाहता लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतरच त्यांना लस मिळणार आहे. यामध्ये सर्व माहिती भरून नोंदणी केल्यानंतर दोन मेसेजस येतात. पहिला मेसेज रेफरन्स आयडी लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे. दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे याचा आहे. एकंदर देशात आता लसीकरण जोमाने होणार आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply