खोपोली : प्रतिनिधी
कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडिक यांनी त्यांचे बंधू प्रवीण यांचा विवाह सोहळा रविवारी (दि. 9) अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला. या लग्न सोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून महाडिक यांनी खोपोलीतील नियोजित कोविड रुग्णालयाला 25 हजारांच्या मदतीचा धनादेश कोविड रुग्णालय कमिटीचे सदस्य नरेंद्र गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. लग्न सोहळ्यात हळदी समारंभासह लाखो रुपये खर्च केले जातात. यादरम्यान हजारो लोक नववधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संक्रमण साखळी तोडण्यासाठी शासनाने 25 लोकांमध्ये विवाह सोहळा करण्याचे निर्बंध घातले आहेत. सध्या खालापूर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असून मुंबई, नवी मुंबई तसेच पुण्यात उपचारासाठी बेड मिळत नाहीत तसेच पैशांअभावी अनेकांना उपचार घेताना अडचण येत आहे. अशा परिस्थितीत खोपोलीमध्ये 50 बेडचे ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा असलेले रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. तेथे गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या रुग्णालयाच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर आरपीआयचे युवा नेते प्रमोद महाडिक यांचे बंधू तथा आरपीआय युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाडिक आणि अंकीता पवार यांचा विवाह सोहळा रविवारी शासनाच्या निर्बंधांचे पालन करीत साध्या पध्दतीने खोपोली यशवंतनगर येथे संपन्न झाला. या लग्नसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून महाडिक यांनी खोपोलीतील नियोजित कोविड रुग्णालयाला 25 हजार रुपयांचा धनादेश आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष तसेच कोविड रुग्णालय कमिटीचे सदस्य नरेंद्र गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी नगरसेवक किशोर पानसरेसुध्दा उपस्थित होते.
सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्ते एकत्रित येऊन खोपोलीत कोविड रुग्णालय सुरू करीत आहेत. जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रवीण महाडिक यांचा विवाह सोहळा शासनाच्या नियमांचे पालन करीत साजरा करण्यात आला. या सोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून प्रमोद महाडिक यांनी कोविड रुग्णालयासाठी मदत केली आहे.
– नरेंद्र गायकवाड, सदस्य, कोविड रुग्णालय कमिटी खोपोली