नेरळ येथे परीक्षणादरम्यान माहिती
कर्जत ः बातमीदार
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी नेरळ स्थानकाची पाहणी आणि परीक्षण करताना पावसाळ्यात घडलेल्या आपत्तीचा व्हिडीओ पाहिला. त्या वेळी भविष्यात अशा आपत्तीच्या वेळी तोंड देण्यासाठी स्वतःचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र असावे, असा निर्णय घेतला असून रेल सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन टीम बनविली जात आहे. त्या टीमकडून निसर्गामुळे निर्माण होणार्या आपत्तीच्या काळात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मध्य रेल्वेकडून त्रैवार्षिक परीक्षण करण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेचे महाव्यवथापक संजीव मित्तल आले होते. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसह संजीव मित्तल यांनी नेरळ रेल्वे स्थानकाची पाहणी केली. सध्या प्रवासी वाहतूक बंद असलेल्या पण 100 वर्षांची परंपरा असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनमधून महाव्यवस्थापक मित्तल यांनी काही मीटर सैर केली. त्यानंतर त्यांनी मध्य रेल्वेच्या नेरळ येथील कार्यशाळेत जाऊन नॅरोगेज मार्ग कसा आहे याची पाहणी केली. या वेळी त्यांनी नॅरोगेज आणि मिनीट्रेनबाबत माहिती देणार्या पुस्तिकेचे प्रकाशनही केले. तेथून नव्याने उभारण्यात आलेल्या वाहनतळाची संजीव मित्तल यांनी पाहणी केली. रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची पाहणी केल्यानंतर त्यांच्या हस्ते नेरळमधील मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकारीवर्गासाठी उभारण्यात आलेल्या कम्युनिटी सेंटरचे उद्घाटन संजीव मित्तल यांच्या हस्ते होणार होते, मात्र या कम्युनिटी सेंटरसाठी मेहनत घेणारे मॅकॅनिक विभागाचे कर्मचारी रणजित कुमार यांच्या हस्ते यांनी उद्घाटन करून घेतले. माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, नेरळ ग्रामपंचायत सरपंच रावजी शिंगवा, उपसरपंच शंकर घोडविंदे, नेरळ शिवसेना शहरप्रमुख रोहिदास मोरे तसेच नेरळ प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांचे स्वागत केले.
माथेरान मिनीट्रेनबाबत मात्र भाष्य नाही
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मे 2019पासून प्रवासी वाहतूक बंद असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनच्या विशेष गाडीमधून काही मीटर अंतरावर प्रवास केला, मात्र त्याच मिनीट्रेनची नेरळ-माथेरान प्रवासी सेवा कधी सुरू होणार, याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी त्याकडे कानाडोळा करीत मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार हे माहिती देतील, असे स्पष्ट करून त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.