Breaking News

एका मल्टीबॅगरची अविश्वसनीय गोष्ट

मागील काही लेखांत आपण मल्टीबॅगर्स शोधण्यासाठी काही निकष पाहिले होते. आजच्या लेखात एका मल्टीबॅगर्स शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कसे मालामाल केले याबद्दल जाणून घेऊ.

गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर गावातील ऐंशीच्या दशकातील. महंमद अहमद या 27 वर्षीय तरुणाच्या वडिलांच्या निधनामुळे त्याच्या वडिलांच्या मालकीची काही जमीन विकून आलेल्या 80000 रुपयांची चार भावांमध्ये समसमान वाटणी झाली. त्यापैकी एक भाऊ अंमळनेर सोडून गेला, तर बाकीच्या दोघांनी आपापली दुकाने थाटली. महंमद संभ्रमावस्थेत चौकातील चहाच्या दुकानात बसलेला असताना मुंबईहून आलेला एक सतिश शहा नावाचा दलाल त्याला तिथे भेटला. सतिश शहा आपल्या अशिलांसाठी (क्लायंट्स) जितके शक्य होतील तेवढे त्या गावात 1945 मध्ये सुरू झालेल्या कंपनीचे म्हणजे वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लि.चे शेअर्स गोळा करावयास (गावातील लोकांकडून खरेदी करावयास) आला होता. सतिश शहाने त्या फॅक्टरीकडे बोट दाखवून महंमदला एक प्रश्न विचारला की, तुम्ही येथे कोणाला ओळखता का ज्यांच्याकडे त्या फॅक्टरीचे शेअर्स आहेत? यावर साध्याभोळ्या महंमदने उत्तर दिले की त्या कंपनीचे मालक तर मुंबईला राहतात. त्यावर सतिश शहाने त्यास सांगितले की कसे कोणीही कंपनीचे शेअर्स विकत घेऊन त्या कंपनीमध्ये काही अंशी मालक बनू शकतो व याच गोष्टीमुळे महंमदची जिज्ञासा चाळवली गेली. गाव छोटेसे असल्याने प्रत्येक जण एकमेकास ओळखत होता. मग महंमद सतिश शहांना घेऊन गावातील घरोघरी फिरला व ज्यांना त्या कंपनीचे शेअर्स विकायचे होते त्यांच्याकडून विकत घेण्यास महंमदची मदत झाली व त्याने स्वतःजवळील 20000 रुपयांपैकी 10000 रुपयांचे 100 शेअर्स (100 रु. दर्शनी किमतीचे) स्वतःसाठीदेखील विकत घेतले.

मग त्या कंपनीने 1981 साली एकावर एक बोनस शेअर दिला. आता महंमदकडे झाले 200 शेअर्स. पुन्हा 1985 साली त्या कंपनीने एकावर एक बोनस शेअर दिला. आता महंमदकडे झाले 400 शेअर्स. नंतर 1986 मध्ये कंपनीने आपल्या शेअर्सचे रु. 100चे 10 रु. दर्शनी मूल्यामध्ये विभाजन केले. अशा प्रकारे आता त्याच्याकडे झाले 4000 शेअर्स. परत 1987 साली कंपनीने एकास एक शेअर बोनस दिला. त्यामुळे त्याच्याकडे झाले 8000 शेअर्स.

पुन्हा 1989 मध्ये कंपनीने एकावर एक बोनस शेअर जाहीर केल्यामुळे महंमदकडे आता झाले 16000 शेअर्स. तीच कथा 1992 व 1995 साली… पुन्हा कंपनीकडून एकास एक बोनस जाहीर, त्यामुळे महंमद बनला 64000 शेअर्सचा मालक. 1997 साली कंपनीने एकास दोन बोनस शेअर्स जाहीर केले. त्यामुळे महंमदकडच्या शेअर्सची संख्या झाली 1,92,000 (64000 ु 2 = 128000 बोनस शेअर्स; अधिक मूळचे 64000 शेअर्स).

नंतर 1999 साली कंपनीने आपल्या शेअर्सची दर्शनी किंमत रु. 2 केली. त्यामुळे महंमदकडील शेअर्स झाले 9,60,000 (192000 ु 5).

2004 मध्ये पुन्हा कंपनीने एका शेअरवर दोन शेअर्स बोनस दिले. आता त्याच्याकडील शेअर्सची संख्या झाली 28,80,000 (960000 ु 2 = 1920000 बोनस शेअर्स अधिक मूळचे 9600000 शेअर्स). परत 2005 साली कंपनीकडून एकावर एक बोनस शेअर जाहीर, आता महंमद मालक होता 57,60,000 शेअर्सचा. 2010 मध्ये कंपनीने 2:3 बोनस म्हणजेच तीन शेअर्सवर दोन शेअर्स बोनस जाहीर केले व अशा रितीने महंमदच्या नावावर जमा असलेले शेअर्स होते 96,00,000 (शहाण्णव लाख).

      मागीलच वर्षी (2017 मध्ये) या कंपनीने पुन्हा एकास एक शेअर बोनस म्हणून जाहीर केला (1 कोटी 92 लाख) आणि 2019 मध्येदेखील कंपनीने तीन शेअर्सवर एक शेअर बोनस दिला म्हणजे अशा प्रकारे महंमदकडील या कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या झाली आजतागायत  2 कोटी 56 लाख शेअर्स आणि या शेअर्सचा मागील आठवड्याचा बंद भाव आहे 507 रुपये. त्याप्रमाणे एकूण आजचे मूल्य होतेय तब्बल 1297 कोटी रुपये व याव्यतिरिक्त मागील 38 वर्षांत या शेअर्समधून एकत्रितपणे 146 कोटी 80 लाख रुपये तर लाभांशापोटी मिळाले असतील. अशा प्रकारे ती 10000 रुपयांची गुंतवणूक ठरली आजचे 1946 कोटी 92 लाख रुपये.

महंमद मिळालेला लाभांश मुक्तहस्ते दान करतात. त्यांची परदेशात शिकलेली मुले त्यांना वारंवार ते शेअर्स विकायचा सल्ला देतात, परंतु अझीम प्रेमजी हे जोवर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत तोपर्यंत शेअर्स विकायचे नाहीत असे व्रतच महंमदने घेतलेय. हा आहे संयम आणि विश्वास.

सूज्ञांनी आतापर्यंत या मल्टीबॅगर्स कंपनीचे नाव ओळखले असेलंच.. विप्रो. 7 जून 1977 मध्ये कंपनीचे नाव ‘विप्रो’ असे बदलले गेले. आज ती आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.

सुपर शेअर : युनायटेड फॉस्फरस

युनायटेड फॉस्फरस या शेतकी व्यवसायाशी संबंधित कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीतील जाहीर केलेल्या जबरदस्त निकालांमुळे हा शेअर मागील आठवड्यात सुमारे 21% वाढून आठवड्याचा सुपर शेअर ठरला. कंपनीच्या शेअरनी आजपर्यंतच आपला सर्वोच्च भाव (764) नोंदवला. तसेच कंपनीने प्रतिशेअर रु. 10 लाभांशदेखील जाहीर केला आहे. लॅटिन अमेरिका आणि युरोपखंडातील उत्तम कामगिरीच्या जोरावर कंपनीचे गेल्या तिमाहीतील उत्पन्न वाढून  12796 कोटी रुपयांवर गेले, तर निव्वळ नफा 60 टक्क्यांनी वाढून रु. 2178 कोटींसमोर रु. 3495 झालेला आहे.

मागील वर्षातील कोरोनासदृश परिस्थितीप्रमाणे कंपनीच्या धोरणांमध्ये बदल करीत गेल्यामुळे कंपनीने हे यश मिळविले, असे कंपनीचे सीईओ जय श्रॉफ म्हणाले. संपूर्ण कृषी उत्पादने एकाच छताखाली आणणे आणि त्यासाठी उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजीचा वापर करणे ही कंपनीची खासियत आहे. नुकतेच 96% मान्सूनचे आडाखे आणि येणारा मोसम या शेअरभावास हात देणार का, ते आता पाहायचे.

-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply