मुंबई : प्रतिनिधी
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे पवारांवर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर किंवा राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई केलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिखर बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली, मात्र राज्य सरकारचा या कारवाईशी संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई केली. या गुन्ह्यामध्ये 70 जणांची नावे आहेत. 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातील दखल ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा एफआयआर करीत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागत आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली, अशा प्रकारचे आरोप कालपासून होत आहेत. त्याला काहीही अर्थ नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.