Breaking News

नव्या आर्थिक बदलांतील तीन महत्त्वाची पावले

कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल केले असून ही साथ जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत अनेक बदल अपेक्षित आहेत. आपण येथे आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता सध्या कोणते बदल आपल्या आजूबाजूला होत आहेत याचा विचार करणार आहोत. कोरोना साथीने सर्व जगाचे आर्थिक नुकसान केले असून त्याला भारत अपवाद असण्याचे कारण नाही. भारताचे नुकसान म्हणजे भारतातील नागरिकांचे नुकसान. ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांना उपचारांवर मोठा खर्च करावा लागला, ज्यामुळे त्यांना त्यांची आर्थिक पुंजी तर खर्च करावीच लागली, पण त्यांच्या भविष्यातील आर्थिक विवंचनाही वाढल्या. 

पहिले पाऊल आरोग्य विमा

भविष्यातील आर्थिक समस्या कमी करण्यासाठी काही जागरूक नागरिकांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हणजे आरोग्य विमा काढणे होय. या काळात ज्यांच्याकडे आरोग्य विमा होता, ते नागरिक आर्थिक फटका बसण्यापासून वाचले आहेत हे लक्षात आल्याने अनेक जण आता आरोग्य विमा काढत आहेत. आरोग्य विमा ही आर्थिक नियोजनात सर्वांत आधी करण्याची गोष्ट आहे, पण तिला उशीर झाला असल्यास त्याचा विचार करीत बसण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर कुटुंबाचा आरोग्य विमा काढणे अतिशय महत्त्वाचे आहे. सरकारी कंपन्यांसह अनेक कंपन्या या क्षेत्रात असून त्यांच्यावर सरकारी यंत्रणांचे नियंत्रण असल्याने कोणत्याही कंपन्यांचा विमा काढण्यास हरकत नाही. या विम्याची रक्कम वर्षातून एकदा भरावी लागते. त्यातून आपल्याला परत काही मिळत नसले तरी आजारपणात येणार्‍या मोठ्या खर्चाची जोखीम कमी होते हे लक्षात ठेवले पाहिजे. विमा आहे म्हणून आपल्याला दरवर्षी काहीतरी मिळाले पाहिजे या विचारातून बाहेर पडून दरवर्षी आरोग्य विम्याचा हप्ता भरला पाहिजे. त्याला मिळणारी इन्कम टॅक्समधील सूट हा किरकोळ मुद्दा आहे. आपण किती लाखाचा विमा घेतो आणि त्यात कोणकोणत्या आजाराची जोखीम विम्यातून कमी करतो यावर वर्षाला किती रक्कम भरायची हे अवलंबून असते. शिवाय जेव्हा आपण निरोगी आहोत, तोपर्यंत तो कमी रकमेत मिळतो हेही लक्षात ठेवले पाहिजे. तात्पर्य अजून आरोग्य विमा काढला नसल्यास तो काढून घेतला पाहिजे.

दुसरे पाऊल डिजिटलायशेनचा स्वीकार

दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डिजिटलायशेन वेगाने वाढत चालले आहे. त्याविषयीच्या मनातील शंकाकुशंका आता बाजूला ठेवून त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली पाहिजे. आतापर्यंत अनेक आर्थिक व्यवहार करण्यासाठी आर्थिक संस्थांच्या पायर्‍या अनेक वेळा चढाव्या लागत होत्या, पण आपला व्यवसाय कमी होऊ नये आणि ग्राहकांचीही सोय व्हावी म्हणून अशा सर्व संस्थांनी डिजिटलायशेनला वेग दिला आहे. त्यामुळे अगदी घरी बसून केवायसी पूर्ण करणे, जवळपास सर्व आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आपले महत्त्वाचे आर्थिक निर्णय लांबणीवर टाकण्यापेक्षा ते डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यास सुरुवात केली पाहिजे. अशा आर्थिक व्यवहारांचे पासवर्ड सांभाळणे आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित करणे ही घराची किंवा गाडीची किल्ली सांभाळण्यासारखीच गोष्ट आहे हे एकदा मान्य केले की ते एकत्र लिहून आपल्या घरात ठेवल्यास ही विशेष त्रासाची बाब राहत नाही. डिजिटल व्यवहार अधिकाधिक सुरक्षित व्हावेत यासाठी सरकार आणि संबंधित संस्था प्रयत्न करीत आहेतच. उदा. इतके दिवस एटीएममध्ये कार्ड वापरून पैसे काढता येत होते, पण आता काही ठिकाणी कार्ड वापरल्यावर फोनवर ओटीपी येतो आणि तो टाकल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. म्हणजे ज्या फोनची नोंद बँकेत आहे, तो फोन असल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. एटीएमसंबंधीची फसवणूक यामुळे टळणार आहे.

तिसरे पाऊल गुंतवणूक

तिसरा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यकाळासाठीची आर्थिक तरतूद. त्याची गरज पुढील काळात अधिकच वाढणार असून तिची तरतूद अनेक जागरूक नागरिक करताना दिसत आहेत. घरी बसून शेअर बाजारातून कमाई करणारा एक मोठा वर्ग या काळात तयार झाला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांची संख्या गेल्या दीड वर्षात एका कोटीने वाढली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घेता ही फार मोठी संख्या नसली तरी कमी काळात एवढे अधिक नवे नागरिक आतापर्यंत शेअर बाजारात आले नव्हते. अर्थात आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्याने आणि गुंतवणुकीयोग्य रक्कम नसल्याने अजूनही अनेक नागरिक शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून दूरच आहेत, पण असेही काही नागरिक आहेत, जे शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा चांगला फायदा घेत आहेत. तो मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड होय. देशाची आर्थिक स्थिती खालावली असे साधारण चित्र असताना शेअर बाजार मात्र पूर्वीसारखाच आशावाद दाखवत आहे. त्यामुळेच तो गेल्या एका वर्षात दुपटीने वाढला आहे. याचा फायदा म्युच्युअल फंडाच्या मार्गाने घेतला जाऊ शकतो हे ज्यांच्या लक्षात आले, त्यांनी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळेच म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता गेल्या एप्रिलमध्ये तब्बल 32.4 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. 32 लाख कोटी रुपये म्हणजे भारत सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही अधिक! म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वांत चांगला मार्ग समजला जातो तो म्हणजे एसआयपी. म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याचा अर्थ आपल्या मासिक कमाईतून विशिष्ट रक्कम चांगल्या म्युच्युअल फंडात दर महिन्याला जमा करणे. असे सध्या साडेआठ हजार कोटी रुपये भारतीय गुंतवणूकदार दर महिन्याला जमा करीत आहेत. (एकादा बँकेत फॉर्म भरून दिला की ते परस्पर होते. आता तर त्यासाठी बँकेत जाण्याचीही गरज राहिलेली नाही.) या मार्गाने शेअर बाजारातील चढउताराचा फायदा म्युच्युअल फंड कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना करून देतात. या मार्गाने 10पासून 50 टक्के परतावा देणारे म्युच्युअल फंड आहेत. कोणत्या म्युच्युअल फंडात एसआयपी करावी आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी या क्षेत्राची चांगली माहिती असलेला मित्र किंवा सल्लागार मात्र मिळविला पाहिजे. गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग बाजूला पडत असून नवे मार्ग जग स्वीकारताना दिसत आहे. त्यात आपण आपल्या परीने भाग घेतला पाहिजे.

-यमाजी मालकर, अर्थप्रहर

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply