पनवेल ः प्रतिनिधी
आरोग्य मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीने 18 ते 21 मेपर्यंत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कोविड 19 आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय जन स्वास्थ्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे उपायुक्त डॉ. धवल थोरात यांच्यासह सहसंचालक डॉ. सुधीर वंजे, पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एस. लोहारे उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात कोविड आजाराशी तपासणी संबंधित येणारे नागरिक अथवा रुग्णांना कोविड आजारात काय काळजी घ्यावी, आजार होऊ नये म्हणून काय उपाययोजना करावी, समाजात वावरताना काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. हे प्रदर्शन केवळ कोविड आजाराशी संबंधित बाधित रुग्ण व लक्षणे असलेल्या नागरिकांना पाहण्यास ठेवण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी. एस. लोहारे यांनी सांगितले.