सुमारे एक वर्षापुर्वी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तौक्ते चक्रीवादळ आले. एक वर्षाच्या आत दोन वादळ आल्यामुळे रायगडकर कोलमडून गेले आहेत. शेतकरी, बागयतदार, श्रमिक, कामगार सर्वांनाच याचा फटका बसला आहे. घरे कोसळली, वीजपुरवठा खंडित आहे, संपर्क यंत्रणा कोलमडली, पाणीपुरवठा योजना बंद आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या तुलनेत तौक्ते वादळाने केलेले नुकसान कमी आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करत आहेत. ते सावरतीलदेखील, परंतु पुढे काय? वादळं तर येतच राहणार, प्रत्येक वादळात नुकसान होणार, शासन तुुटपूंजी मतद देणार हे असचं चालू राहणार. मात्र काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. पुर्वी वादळाच्या सूचना वेळेत मिळत नव्हत्या. परंतु आता तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. त्यामुळे वादळ केव्हा येणार, याची माहिती अगादरच मिळते. या वर्षाभरात त्याचा अनुभव सर्वांनाच आला. वादळाची सूचना अगोदच मिळाल्यामुळे काही उपाययोजना करता येतात. त्या केल्या गेल्या. सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच तौक्ते चक्रीवादळातदेेखील जीवित हानी कमी झाली. वादळ येण्यापुर्वी प्रशासनाने खबरदारी घेतल्यामुळे मोठे नुकसान टळले. मात्र इतर नुकसान व्हायचे ते झालेच. प्रत्येक वादळात असे नुकसान होतच राहणार आहे. ते टाळण्यासाठी उपाय योजना करायल हवी. वादळात ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे छप्पर पत्र्याचे होते. हे पत्रे उडून गेले. कौलारू घराचं नुकसान झालेच नाही, असे नाही. मात्र ते तुरळक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, कोकणच्या वातावरणात कौलारु घरच उपयुक्त आहेत. जपानमध्ये वारंवार भूकंप येतात. त्यात घरांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी घरांच्या रचना बदलल्या. त्याप्रमाणे समुद्रकिनारपट्टीवरील घरांच्या रचनेत काही बदल कराता येतील का, याचा अभ्यास केला पाहिजे. वादळ प्रतिरोधक घरे कशी बांधता येतील, याचा विचार केला पाहिजे. या चक्रीवादळत खाजगी मालमत्तेच नुकसान झालेच त्याचबरोबर शासकीय मालमत्तेचदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या इमारती दुरुस्त केल्या जातील. पुन्हा उभ्या राहतील. मात्र या पुढे सर्व शासकीय इमारती वादळ प्रतिरोधक पद्धतीनेच बांधल्या गेल्या पाहिजेत. या इमारती वादळातदेखील भक्कमपणे उभ्या राहतील अश्या पद्धतीनेच बांधल्या पाहिजेत. म्हणजे वारंवार होणारे नुकसान टाळता येईल. समुद्रकिनार्यावरील तसेच खाडीकिनार्यावरील गावांमधील घरेदेखील वादळ प्रतिरोध पध्दतीने बांधली पाहिजेत. चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वीजेच्या तारा तुटून, खांब कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवित हानी होत असते. शिवाय विद्युत पुरवठा खंडित होऊन त्याचा जनजीवनावर परिणामही होत असतो. हे टाळण्यासाठी राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत समुद्रकिनार्या जवळील शहरांमध्ये विद्युतवाहिन्या भूमिगत टाकण्याची योजना जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून राबविली जात आहे. या प्रकल्पासाठी अलिबाग शहराची निवड करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर या कामाला सुरूवात झाली होती. सध्या हे काम पुन्हा रखडले आहे. हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर तौक्ते चक्रीवादळात अलिबाग शहाराचा वीजपुरवठा सुरळीत राहिला असता. जिल्ह्यातील समुद्रकिनार्यावरील मुरुड, श्रीवर्धन व उरण या शहरांसाठी तसेच खाडीकिनार्यावरील काही गावांमध्ये असे प्रकल्प राबविणे काळाची गरज आहे.आपत्ती निवारण कार्यक्रमा अंतर्गत समुद्रकिनार्यावरील गावांमध्ये आपत्ती निवारा शेड बांधण्यात येणार होत्या. गावाना धोका असल्यास गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यासाठी अशा निवारा शेड उभारण्यात येणार होत्या. रायगड जिल्ह्यात दिघी, बोर्ली येथे निवारा शेडसाठी मंजुरीही देण्यात आली होती. मात्र त्यासाठी 20 गुठे जागा असावी लागते. कोकणात अशी सलग 20 गुंठे जाग मिळणे कठिण आहे. त्यामुळे छोट्या छोट्ट्या निवारा शेड बांधण्याचे प्रयत्न व्हायल हवेत. निवारा शेड बांधण्यासाठी 22 शाळांची निवड करून त्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. ते मंजूर करून घेऊन या शेड उभारायला हव्यात. वादळ आलं, अतिवृष्टी झाली किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये संपर्क यंत्रणा सहीसलामत असणे आवश्यक असते. ती कोलमडली की, संपर्कच तुटतो. अशावेळी धावून येतात ते हॅम रेडिओ ऑपरेटर. प्रत्येक वेळी पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा पूरी पडेलच असे नाही. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हॅम रेडिओ केंद्र सुरू करणे, ही काळाची गरज आहे.
-प्रकाश सोनवडेकर