सोशल डिस्टन्सिंगचे होतेय पालन
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड आदी ठिकाणाहून आलेले कामगार व मजूर हे आता त्यांच्या स्वतःच्या गावी रवाना होत आहेत. यासाठी त्यांना पनवेल येथील रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी 12 एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या. आगारात सोशल डिस्टन्स पाळून सर्व मजूर आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी सज्ज झाले. अनेक दिवसांपासून संचारबंदीमुळे हे कामगार गावाकडे जाण्यास उत्सुक असतानाही त्यांना येथेच अडकून पडावे लागले. कोणतेही काम नसल्यामुळे घरात बसूनच दिवस काढावे लागत होते. कमाईचे साधन उपलब्ध नसल्याने या मजुरांना हलाखीत दिवस काढावे लागत होते. संचारबंदी शिथिल होताच या कामगारांना घरी सोडण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाल्याने या सर्व मजुरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
प्रवासाची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल या मजुरांनी शासनाचे आभार मानले आहेत. सर्व मजुरांना पाण्याची बाटली, भोजनाचा डबा व बिस्किटे तहसील कार्यालयामार्फत वितरित करण्यात आले. या वेळी मुरूडचे सर्कल अधिकारी विजय महापूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी रेश्मा मसाल, वनिता जायभाय, वर्षा मयेकर, आर. एम. पाटील, सपना वायडे, रूपेश रेवसकर, संतोष पवार यांनी उत्कृष्ट नियोजन करून या कामगारांचे रेल्वे आरक्षण ते एसटी बसेसमध्ये बसून देण्याचे काम केले. डॉ. सुजय इनगले प्रत्येक कामगाराची आरोग्य तपासणी करीत होते. तहसीलदार गमन गावित स्वतः उपस्थित राहून देखरेख ठेवत होते. याबाबत अधिक माहिती देताना नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी सांगितले की, आम्ही 127 मजुरांना उत्तर प्रदेश, झारखंडचे 13, मध्य प्रदेश एक व ओडिसा येथील 11 मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी रेल्वेस्थानकापर्यंत मोफत एसटी सेवा दिली आहे. तसेच अजून काही मजूर असून त्यांनाही गावी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था करणार आहोत.