नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा अफलातून व्यक्ती आहे. खेळाडूंशी फारशी चर्चा न करतादेखील तो संघाच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात वाकबगार आहे, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहिर याने धोनीची स्तुती केली.
75 धावांची दमदार खेळी करतानाच कर्णधार म्हणून वेगळे डावपेच रचत धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाला आठ धावांनी विजय मिळवून दिल्यानंतर ताहिर बोलत होता. ‘तो ज्याप्रकारे संघाच्या गरजेनुरूप स्वतःचा वापर करतो, ते अविश्वसनीय असते. संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठीदेखील तो कधीच संघसहकार्यांशी फार बोलत नाही, पण तरीही तो संघाला सतत प्रेरणा देत राहतो. प्रभावी नेता आणि माणूस म्हणूनदेखील धोनी हा खूप महान आहे,’ असेही ताहिरने सांगितले. ‘धोनीला सर्वोत्तम फिनिशर का मानले जाते, ते त्याने अन्य अनेक सामन्यांप्रमाणे राजस्थानविरुद्धच्या सामन्यातदेखील दाखवून दिले आहे, तसेच ड्वेन ब्राव्होनेदेखील शेवटचे षटक अत्यंत प्रभावीपणे टाकून सामन्यातील विजय निश्चित केला,’ असेही ताहिरने नमूद केले.