रोम ः वृत्तसंस्था
युव्हेंटस संघाने अॅटलांटाचा 2-1 असा पराभव करीत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी सरशी साधली.
युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे 14वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने 31व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर अॅटलांटाने रस्लन मलिनोवस्की (41व्या मिनिटाला) याच्या गोलमुळे सामन्यात बरोबरी साधली, मात्र फेडेरिको चिएसा याने 73व्या मिनिटाला निर्णायक गोल करीत युव्हेंटसला जेतेपद मिळवून दिले. मोसमातील दुसरे जेतेपद पटकावल्यानंतर आंद्रिया पिलरे यांनी युव्हेंटसच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेत पॅरिस सेंट-जर्मेन अजिंक्य
पॅरिस : किलियन एम्बाप्पेच्या शानदार कामगिरीमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने मोनॅकोचा 2-0 असा पराभव करीत फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडे राखले. त्यांचे हे 14वे जेतेपद ठरले. याआधी अंतिम फेरीत दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. 2010मध्ये पॅरिस सेंट-जर्मेनने 1-0 असा विजय मिळवला होता, तर 1985मध्ये मोनॅकोने 1-0 अशी बाजी मारली होती.