खालापूर : प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीमध्ये संस्कृती, प्रकृती आणि विकृती हे होत असताना भारताने महामारीवर रामबाण हायड्रोक्लोरीन गोळी देऊन जगाला आपली संस्कृती उच्च असल्याचे दाखवून दिले, असे उद्गार भाजपचेे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे काढले. खालापूर तालुका देशमुख मराठा समाजाच्या वतीने आणि सूर्यकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या यशोगाथा विशेषांक 2021च्या बुधवारी (दि. 13) झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यास माजी आमदार सुरेश लाड, खोपोलीच्या नगराध्यक्ष सुमन औसरमल, भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष श्रीकांत पुरी, खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, देशमुख मराठा समाजाचे उल्हास देशमुख, भाजप नेते सूर्यकांत देशमुख, हेमंत नांदे, विठ्ठल मोरे, दिलीप पवार, दिलीप देशमुख, राकेश दबके, सनी यादव आदी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीने पुढच्या पिढीला समाजाची सेवा करण्याचे मार्गदर्शन केले आहे. स्वत:च्या ताटातील दुसर्याला देणारी ही संस्कृती जगात महान आहे असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देशमुख मराठा समाजाने भरभरून प्रेम दिले आहे. दोन वेळा खासदार होण्याचा मान या समाजाने दिला. त्यामुळे या समाजाशी भावनिक नाते निर्माण झाले आहे. देशमुख समाजातील मान्यवरांनी देशालाही खूप दिले आहे. प्रकाशाचा दिवा, कर्तृत्वाचा सुगंध दुसर्या पिढीकडे पसरत राहो. जुन्या पिढीकडून तरुण पिढीला मार्गदर्शन व संधी निर्माण केली जावी अशी अपेक्षा करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूर्यकांत देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. उल्हास देशमुख यांनी सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वातून खोपोलीत भव्य सभागृह निर्माण झाले आहे. सार्वजनिक कामात जात-धर्म, राजकारण आड येता कामा नये. वडिलांप्रमाणेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये संस्कार आहेत. हे संस्कारच माणसाला मोठे बनवतात. माजी आमदार सुरेश लाड, खोपोलीच्या नगराध्यक्ष सुमन औसरमल, यावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे किशोर पाटील, जि. प. सदस्य नरेश पाटील यांनीही विचार मांडले. आर. आर. देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनी राम मंदिर निधी संकलन कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच खोपोलीतील सहज सेवा या वृत्तवाहिनीच्या कार्यालयास भेट देत शेखर जांभळे यांना शुभेच्छा दिल्या.