पाली : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावात रविवार (दि. 23) पासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी एका मोटारपंपाने ओढून जॅकवेलमध्ये आणले जाते आणि ते जलकुंभामध्ये साठवून गावाला पाणीपुरवठा केला जातो. तौत्के चक्रीवादळात येथील मोटरपंप जळाला होता. त्यानंतर तिथे दुसरा मोटारपंप बसविण्यात आला. मात्र तोही बिघडला आहे. ते दोन्ही पंप दुरुस्तीसाठी दिले असल्याने मागील पाच दिवसांपासून जांभूळपाडा ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाणी नसल्याने खूप गैरसोय झाली आहे. ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागते. त्याचा खूप त्रास होतो, असे येथील ग्रामस्थ नूरजहाँ पठाण यांनी सांगितले. तौत्के चक्रीवादळात पाणीपुरवठा योजनेतील एक मोटार पंप जळल्याने दुसरा पंप बसविण्यात आला. मात्र तोदेखील नादुरुस्त झाला. मागील 4-5 दिवस पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज नवीन पंप बसवून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. -सचिन केंद्रे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत जांभूळपाडा