Breaking News

खारघर, तळोजात पाणी तक्रारींसाठी सिडको सरसावली

तक्रारींसाठी व टँकरच्या मागणीसाठी कॉल, एसएमएसची सुविधा

नवी मुंबई ः बातमीदार

खारघर आणि तळोजा नोडमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि टँकरची मागणी करण्यासाठी नागरिकांनी 9324950948 या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉटसअप संदेशद्वारे किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, नैना शहर, महागृहनिर्माण योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे दक्षिण नवी मुंबईतील खारघर आणि तळोजा नोडला नागरिकांकडून वास्तव्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील पाण्याची मागणीही वाढत आहे. सद्यस्थितीत सिडकोकडून हेटवणे पाणी पुरवठा योजनेसह नवी मुंबई महानगरापालिका, एमआयडीसी यांच्या मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु या परिसरातील सन 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून सिडकोकडून आतापासूनच वाढीव पाणी पुरवठ्यासाठी विविध उपायोजनांचा अवलंब केला जात आहे. यासाठी सिडकोकडून विविध लघुकालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.

याशिवाय तातडीची उपाययोजना म्हणून व नागरीकांच्या विनंतीनुसार सिडकोने पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरील मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिक पाणी पुरवठ्या संदर्भातील तक्रार नोंदवू शकतात. तसेच टँकर संदर्भातील मागणीसाठीही नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply