प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
अंतुले सरकारकडून शेतकर्यांनी केलेल्या अपेक्षा काही दिवसांतच फोल ठरल्या. कारण शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकर्यांच्या जमिनीला एकरी 15 हजार रुपये किंमत देण्याचे मान्य केले होते, ती किंमत देण्यास अंतुले सरकारने टाळाटाळ तर केलीच आणि नंतर नाकारलेही. सरकारचे म्हणणे होते की, न्हावा-शेवा खाडीतील जमीन ही नापीक आहे. या नापीक जमिनीला एवढा भाव का द्यावा? त्यावर शेतकर्यांचे म्हणणे होते की, सरकारने एकदा हा भाव ठरवला आणि तो सर्वमान्य
झाला असता. आता त्यात हे सरकार बदल का करते. शेतकर्यांचा हा विश्वासघात आहे.
सरकारच्या या धोरणामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. त्यांनी जमीन बचाव संयुक्त आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावोगावच्या सभा, बैठका सुरूच होत्या. जमिनीला योग्य भाव मिळाल्याशिवाय सिडकोला जमीन द्दायची नाही हा शेतकर्यांचा निर्धार पक्का होता.
19 जून 1981 रोजी शेतकर्यांनी जासई नाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. लढ्याचा जोर वाढल्यामुळे सरकारने न्हावा-शेवा आणि जासई गाव परिसरात पोलीस व एसआरपीचा बंदोबस्त वाढवून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी आंदोलक घाबरले नाहीत. त्यांनी प्रचंड घोषणा देत जासई नाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, गावकरी रस्त्यावर बसले होते. पोलीस आणि एसआरपीचे जवान त्यांना हटवण्याचा प्रयत्न करीत होते. लाठीमार करून हुसकावत होते, पण लाठीचे प्रहार पाठीवर, छातीवर, डोक्यावर झेलूनही आंदोलक रस्त्यावरून हटत नव्हते. पोलिसांच्या या अमानूष लाठीहल्ल्यात अनेक शेतकरी, बायाबापडे, वृद्ध माणसे, लहान मुले जखमी झाली. दि. बा. पाटील या आंदोलकांना धीर देत होते. त्यांनाही पोलिसांच्या लाठीचा तडाखा सहन करावा लागला. तेही रक्तबंबाळ झाले. त्यांचे सारे कपडे रक्ताने माखले, डोक्याला मोठी जखम झाली, पण ते आंदोलनातून मागे हटत नव्हते.
‘दिबां’चे सहकारी डी. आर. पाटील, शेकापचे नेते जनार्दन भगत, झिपर मुंडे, जे. एम. म्हात्रे, श्रावण कोळी असे अनेक जण पोलिसांच्या या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. तरीही एका जिद्दीने त्यांनी हे रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवले. शेवटी पोलिसांनी या आंदोलकांवर अश्रुधूर व त्यानंतर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यात महिलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले. या जखमींपैकी तिघांना तातडीने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे जासई, गव्हाण, न्हावा-शेवा परिसरातील वातावरण तंग बनले. शेतकर्यांचा संताप अनावर झाला होता. एवढेच नव्हे तर पोलिसांनी या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी घरात घुसून लोकांंना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी लहान मुले वा वृद्ध माणसांनाही सोडले नाही. अतिशय क्रूरपणे पोलीस वागत होते. उरण परिसरात त्यांनी संचारबंदी जाहीर केली, पण शेतकर्यांचा विरोध कायम होता.
पोलिसांनी लाठीमार करून अनेक आंदोलकांना अटक केली. रक्ताने माखलेल्या दि. बा. पाटील यांनाही अटक झाली. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला. अशा अवस्थेतही त्यांनी सरकारला खडसावून सांगितले, ‘सरकारने शेतकर्यांच्या जमिनीला योग्य भाव दिला नाही तर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू.’
पोलिसांनी केलेल्या या अमानूष गोळीबाराच्या निषेधार्थ उरण बंद पाळण्यात आला. विधान परिषदेचे तत्कालीन सदस्य ग. प्र. प्रधान यांनी या घटनेचा जाहीर निषेध करून गोळीबाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …