Breaking News

शोकांतिका की गूढकथा

अकाली अस्तंगत झालेला बॉलीवूडचा सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूभोवताली दाटलेले संशयाचे धुके आतातरी निवळेल अशी अपेक्षा आहे. बरीच राजकीय चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप, खालच्या स्तरावरील गावगप्पा, खर्‍याखोट्या अफवांचे पीक या गोष्टींमुळे गेले दोन महिने देशातील वातावरण गढूळ झाले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा सुस्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बजावला.

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूचे प्रकरण मुंबई पोलीस अत्यंत कार्यक्षमतेने हाताळत असल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार केला होता, तथापि मुंबई पोलिसांनी जवळपास पन्नास-साठ संबंधितांचे जाबजबाब तेवढे घेतले, प्रत्यक्षात साधा एफआयआरसुद्धा नोंदवला नाही. या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नव्हतेच. सत्तेतील पक्षांतर्फे काहीतरी दडवले जात आहे अशी कुजबुज सुरू झाली व त्याचे रूपांतर सोशल मीडियावरील गदारोळात झाले. त्यातच मुंबई पोलिसांनी तपासासाठी आलेल्या बिहारच्या पोलिसांशी संपूर्ण असहकार केला. इतकेच नव्हे तर पाटण्यात एफआयआर नोंदवून मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहारच्या पोलीस अधिकार्‍यास चक्क क्वारंटाइन करण्यात आले. वास्तविक सुशांतसिंह याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली होती व त्यांनीच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणीदेखील केली. सुशांतसिंहच्या वडिलांच्या इच्छेचा मान राखत मुंबई पोलिसांनी स्वत:हून हा तपास सीबीआयकडे सोपवला असता तर काहीच बिघडले नसते. किंबहुना या संपूर्ण प्रकरणाभोवती निर्माण झालेले संशयाचे धुके तरी टळले असते. परंतु ठाकरे सरकारने तपासाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून प्रकरण अधिकच चिघळू दिले. परिणामत: ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जोरदार झटका खाण्याची वेळ आली. मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही, असूही नये. सर्वोच्च न्यायालयानेदेखील मुंबई पोलिसांनी आजवर केलेल्या चौकशीमध्ये बोट ठेवण्याजोगे काहीही आढळत नाही असे नमूद केले आहे, तथापि मुंबई पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत प्राथमिक चौकशीखेरीज कुठलाही ठोस तपास केलेला नाही याचीदेखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंद केली आहे. राजकीय पक्षांच्या साठमारीमध्ये मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेपुढे विनाकारण प्रश्नचिन्ह लागले हे मात्र योग्य झाले नाही. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? गुन्हा घडलाच असेल तर तो कोणी केला आणि का? अशांसारखे अनेक प्रश्न आता सीबीआयला सोडवायचे आहेत. पुढील तपासकामामध्ये मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला आहे. गेले दोन महिने सुशांतसिंहच्या मृत्यूसंदर्भात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तसेच किंबहुना त्याहूनही अधिक बिहारमधील परिस्थिती होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका अगदी उंबरठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे सुशांतसिंहच्या मृत्यूच्या तपासाचा मुद्दा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येणे स्वाभाविक होते. परंतु सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण हा राजकीय मुद्दा अजिबात नसून तो पूर्णत: न्यायालयीन मुद्दा आहे, असे बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. हे सारे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर आतातरी सोशल मीडियावरील गदारोळ व माध्यमांनी सुरू केलेले बातम्यांचे तांडव शमेल अशी अपेक्षा आहे. सुशांतसिंह राजपूतसारख्या तरुण कलावंताचा मृत्यू ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल, परंतु तिला राजकारणाच्या हव्यासापोटी रहस्यकथेचे वळण मिळाले ही दुर्दैवाची बाब आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply