Breaking News

‘रास्ता रोको’च्या त्या आंदोलनात महिलाही धाडसाने पुढे सरसावल्या होत्या!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
जासई नाक्यावर आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते, पण पोलीस आणि एसआरपीचे जवान त्यांना हुसकावून लावण्यासाठी लाठीमार करीत होते. अश्रूधूर आणि गोळीबार सुरू झाल्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. जासईचा नाका रक्तरंजित झाला.
दि. बा. पाटील यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यांचं डोकं फुटलं, ते रक्तबंबाळ झाले. ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. त्यानंतर मात्र आंदोलकांचा संताप अनावर झाला. त्यांनी एसआरपी जवानांना प्रतिकार करायला सुरुवात केली.दगडफेक सुरू झाली. पोलीस मिळेल त्याला झोडपत होते. प्रचंड मारहाण करीत होते. या मारहाणीत अनेकांची डोकी फुटली. काहींचे हात, पाय मोडले, पण आंदोलक पोलिसांवर तुटून पडत होते.
या सार्‍या धुमश्चक्रीत महिलाही आघाडीवर होत्या. त्यांनी धाडसाने पुढे होऊन आंदोलकांना दगड पुरवण्याचे काम केले. त्यामुळे तरुण आंदोलक अधिक त्वेषाने पोलिसांशी दोन हात करायला पुढे सरसावत होते.
एसआरपीचे जवान गोळीबार करीत असताना जीवाची पर्वा न करता या महिला आंदोलकांना शेतातील दगड आणून देण्याचे काम करीत होत्या. त्यांच्या धाडसाचे खरोखरंच कौतुक करायला हवे.
यात सखूबाई म्हात्रे या नावाच्या महिलेने केलेली कामगिरी लक्षवेधी होती. जीवाची पर्वा न करता ती आंदोलकांना शेतातील दगड आणून देत होती.एसआरपी जवानांच्या लक्षात हे येताच त्यांनी सखूबाईवर निशाणा साधला आणि त्यांच्या एका गोळीने सखूबाईला जखमी केले. गोळी आरपार तिच्या छातीत घुसली. ती खाली कोसळली. काहींनी तिला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले, पण ही धुमश्चक्री सुरूच होती. आंदोलक पेटून उठले होते. पोलीस आणि एसआरपी जवानांवर तुटून पडले होते.
त्यामुळे त्यांनी पोलिसांची अधिक कुमक मागवली. आता पोलिसांची ताकद वाढली. त्यांनी आंदोलकांना घरादारात घुसून बेदम झोपायला सुरुवात केली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले.
या आंदोलनाची दखल मुंबईतील वृत्तपत्रांनी अगदी ठळकपणे घेतली. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांच्या या अत्याचाराचा जाहीर निषेध केला, आंदोलकांना पाठबळ दिले. शरद पवार यांनीही जासई येथे येऊन आंदोलनात जखमी झालेल्या शेतकर्‍यांची विचारपूस केली.
‘दिबां’ना जखमी अवस्थेत अटक केल्यानंतर अनेक नेत्यांनी सरकारवर जहरी टीका केली. शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाला पाहिजे ही शेतकर्‍यांची रास्त मागणी असून सरकारने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी या नेत्यांनी सरकारकडे केली.
जासई येथे झालेल्या आंदोलनामुळे सरकारवर झालेल्या टीकेची दखल मुख्यमंत्री अंतुले यांनी घेतली आणि ते स्वत:ही जासईला आले.त्यांनी जखमींची विचारपूस केली, पण त्यांच्या सरकारविरुद्ध शेतकर्‍यांचा संताप वाढत होता, लोक चिडले होते. शेतकर्‍यांविषयी खरोखरच त्यांना सहानुभूती असती तर जमिनीला त्यांनी योग्य भाव दिला असता आणि ही परिस्थिती शेतकर्‍यांवर आली नसती. त्यामुळे अत्याचार करून आता ही सहानुभूती कशासाठी? अशी चर्चा सर्वत्र पसरली होती.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply