अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 15 तालुका पंचायत समित्यांपैकी सात ठिकाणचे सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. माणगावाचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे, परंतु येथे अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे हे पद रिक्त राहू शकते.
सभापतिपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि. 9) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मयुरा महाडिक या चिमुरडीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी म्हस्के पाटील, प्रवीण वरंडे उपस्थित होते.
मुरूड, पेण, पनवेल, तळा, महाड, पोलादपूर आणि म्हसळा या सात पंचायत समित्यांच्या सभापतिपदी महिलांना संधी मिळणार आहे. यापैकी पनवेलचे सभापतिपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असेल. माणगाव अनुसूचित जाती खुला व रोहा अनुसूचित जमाती खुला असे आरक्षण आहे.
सभापतिपदांचे तालुकानिहाय आरक्षण
अलिबाग-सर्वसाधारण, मुरूड-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पेण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पनवेल-अनुसूचित जमाती महिला, उरण-सर्वसाधारण, कर्जत-सर्वसाधारण, खालापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, रोहा-अनुसूचित जमाती, सुधागड-सर्वसाधारण, माणगाव-अनुसूचित जाती, तळा-सर्वसाधारण महिला, महाड-सर्वसाधारण महिला, पोलादपूर-सर्वसाधारण महिला, श्रीवर्धन -नागरिकांचा मागास प्रवर्ग, म्हसळा-सर्वसाधारण महिला.