Breaking News

कीर्तनकार-प्रवचनकार आर्थिक संकटात; लॉकडाऊनचा परिणाम; हरिनाम सप्ताह, धार्मिक कार्यक्रमांवरील बंदीचा फटका

खोपोली ः प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हरिनाम सप्ताह, पारायण सोहळे, विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमही बंद आहेत. परिणामी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, भालदार, चोपदार यांची आर्थिक कोंडी झाली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, तिला कीर्तन-प्रवचनांची परंपरा आहे. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजजागृतीचे काम अनेक जण करीत आहेत. काहींनी कीर्तन व प्रवचन हेच आपले जीवनकार्य म्हणून स्वीकारले आहे, मात्र कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे या वर्गाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बचतीतून, हात उसनवारी, देवस्थान, संस्थानांच्या सहकार्याने मागील काही महिन्यांपासून हा वर्ग कसाबसा चरितार्थ चालवत आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिरे, संस्थानांसह धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे आता सगळीकडूनच मदत बंद झाल्याने जगण्याचा प्रश्न या कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व टाळकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने यातून काही मार्ग काढण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व टाळकरी यांना लॉकडाऊनमुळे चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. समाजातील दानशूर ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंडळींचा आर्थिक भार उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply