पनवेल मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सामन्याचा आनंद
पनवेल ः प्रतिनिधी
नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सामने होत आहेत. पनवेल महापालिकेने ते पाहण्याची संधी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना पाहून विद्यार्थी भारावून गेले. जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉल ओळखला जातो. फुटबॉल खेळाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिफा वर्ल्डकप. या वर्षी भारतात 17 वर्षाखालील फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईस यजमान शहर म्हणून बहुमान मिळालेला आहे. ही स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत देशातील नवी मुंबई (महाराष्ट्र), मडगाव (गोवा) आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथे होत असून या स्पर्धेत एकूण 16 देश सहभागी झाले आहेत. प्रत्येक दिवशी दोन याप्रमाणे पाच दिवसांत एकूण 10 फुटबॉल सामन्यांचे नियोजन नवी मुंबईत करण्यात आले आहे. अंतिम सामनाही नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. पनवेल महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांनाही हे सामने पाहता यावेत यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामन्यांचे पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा लाभ घेत हा सामन्यांचा आनंद विद्यार्थ्यांनी लूटला. पनवेल महापालिकेचे शिक्षण विभाग प्रमुख बाबासाहेब चिमणे यांच्या नियोजनाखाली यापुढील सामनेही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत.