कर्जत : बातमीदार
सलग 30 वर्ष राजकारणात असलेले आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा खासदार करून दिल्लीत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असे प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तिसर्या टप्प्यातील मतदान करण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पक्षादेशाप्रमाणे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महायुतीच्या शिलेदारांनी बुधवारी (दि. 17) उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी प्रचार फेरी काढली होती. डोक्यावर रणरणते ऊन, आणि भूक तहान विसरून नेरळमधील भिताडआळी, हेटकरआळी, टेपआळी आदी भागात प्रचारफेरी काढण्यात आली.
नेरळप्रमाणेच आजूबाजूच्या गावांमध्येही महायुतीच्या प्रचाराचा झंजावात सुरु झाला आहे. धामोते येथे शिवसैनिकांनी ग्रामदेवासमोर नतमस्तक होत, प्रचाराचा नारळ फोडला आहे. धगधगत्या उन्हाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी प्रचाराचे रान उठवले आहे. घराघरात महायुतीच्या जाहीरनाम्याचे वाटप करून ‘आपले मत विकासाला, आपले मत महायुतीला‘ हा नारा दिला आहे. या वेळी शिवसेनेचे विभागप्रमुख महेश विरले, दिनेश कालेकर, देवा पेरणे, शाखा प्रमुख दत्ता विरले, नाना विरले, शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरंग बारणे यांनी आपल्या खासदारकीच्या काळात सभागृहात 91 टक्के उपस्थिती लावली, लोकसभेत काय चालते, हे शिकून घेतले. खासदारीच्या पाच वर्षात सर्वाधिक 1110 प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केले. 543 खासदार असलेल्या लोकसभेत त्यांना 289 वेळा प्रत्यक्ष प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातील आणि देश पातळीवरील तब्बल 20 खासगी विधेयकेदेखील मंजूर करून घेण्याचे काम खासदार बारणे यांनी केले. कार्यकर्त्यांमध्ये ते मिळून मिसळून राहिले. संपूर्ण मतदारसंघात त्यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला.