Breaking News

शिव-समर्थ स्मारकाचे रविवारी लोकार्पण

जेएनपीटी : प्रतिनिधी 
जेएनपीटीच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच दास्तान फाटा येथे विश्वस्त महेश बालदी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे लोकार्पण येत्या रविवारी (17 फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे पुतळे या स्मारकावर नुकतेच चढविण्यात आले. जेएनपीटीच्या मालकीच्या दास्तान फाटा-जासईदरम्यान दोन एकर क्षेत्रात 32 कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक उभारण्यात येत आहे. स्ट्रक्चरसह साधारणतः 92.5 फूट उंचीवर शिव-समर्थ स्मारक उभारण्यात येत आहे. या शिवस्मारक क्षेत्रात आर्ट गॅलरी बनविण्यात येणार असून, त्यात शिवरायांच्या जीवनावरील विविध घटनांबाबतची शिल्प साकारली जाणार आहेत, तसेच रायगड जिल्ह्यातील थोर व्यक्तींची प्रासंगिक चित्रे लावण्यात येणार आहेत. शिवकालीन वस्तूंचे म्युझियमही साकारले जाणार आहे. याशिवाय येथे सांस्कृतिक आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यासाठी मिनी एमपी थिएटर उभारण्यात येणार आहे. क्षुधा शांत करण्यासाठी अद्ययावत कॅफेटेरियाबरोबरच दीड एकर क्षेत्रात फाऊंटन आणि उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे. या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी, शिवरायांचे 13वे वंशज संभाजीराजे भोसले, ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply