पनवेल : वार्ताहर
राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील या डॉक्टरांचा दिशा महिला मंचच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांना झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. पेशाने डॉक्टर असलेल्या पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची मंचच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी गुरुवारी (दि. 1) भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोरोना विरोधात लढाई करण्यासाठी सर्वांत आघाडीवर हे डॉक्टरच आहेत. त्यांच्याशिवाय या महामारी बरोबर दोन हात करता येणे शक्यच नाही. कोरोना काळात पनवेल परिसरात डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम केले. त्यामुळे अनेक रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकले. या कोविड योद्ध्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे, परंतु त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनुषंगाने दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम आंधळे आणि त्यांच्या सहकारी रेखा ठाकूर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सन्मान केला.