अण्णा हजारेंचा खळबळजनक आरोप
नगर : प्रतिनिधी
राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्यापासून सुरुवात केलीच आहे, तर त्यांनी तक्रारीत नमूद सर्व 49 कारखान्यांचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी अण्णांनी केली आहे.
सातार्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केली आहे. बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचे राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आले आहे. त्या आधारेच ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यासंबंधी अण्णा हजारे यांनी पूर्वी तक्रार केली होती. जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर हजारे यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अण्णा म्हणाले, या गैरप्रकाराशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्वीच आमच्याकडे आलेली आहेत. त्या आधारे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तब्बल चार हजार पानी पुरावा त्यासोबत दिला होता, मात्र चौकशी अधिकार्यांनी सोयीचा अहवाल देत या तक्रारीत तथ्य नसल्याचे न्यायालयाला कळविले. या विरोधात आम्ही पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. ते प्रकरण प्रलंबित आहे. महाराष्ट्रात आज सहकार चळवळ मोडण्याचे काम सुरू आहे. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आता ईडीने सर्वच कारखान्यांची चौकशी करावी.