Breaking News

आकड्यांचा खेळ थांबवा

महाराष्ट्रातील केशकर्तनालये रविवारपासून खुली होणार आहेत. निर्बंध खुले होत आहेत. यामुळे संकट ओसरले असा गैरसमज मात्र कुणीही करुन घेता कामा नये. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढलेली दिसणार आहे. त्यामुळे येणारे काही दिवस हे पुन्हा एकदा अतिदक्षता घ्यायला लावणारे आहेत.

गुरुवारी भारतात सतरा हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने आपण पाच लाख रुग्ण संख्येच्या समीप जाऊन पोहोचलो आहोत. शुक्रवारीच हा आकडा चार लाख 90 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसून आले. आता फक्त अमेरिका, ब्राझील आणि रशिया या तीनच देशांची एकूण कोरोना रुग्णसंख्या ही भारतापेक्षा अधिक आहे. सध्या आपल्या देशात रोज पंधरा हजारांहून अधिक नवे रुग्ण नोंदले जात आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला देशात दोन लाखांपेक्षा कमी केसेस होत्या आणि हा महिना संपताना आपण पाच लाख रुग्णसंख्येचा टप्पा पार करताना दिसू याचाच अर्थ या एका महिन्यात तब्बल तीन लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. आपल्या देशातील रुग्णसंख्या वाढीचा अफाट वेग यातून स्पष्ट होतो. गेले काही दिवस रुग्णांची मोठी भर दिल्ली, तमिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांकडून पडताना दिसत होती. परंतु गुरुवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात तब्बल चार हजार 841 नव्या केसेस नोंदल्या गेल्या. हा सारा आकड्यांचा खेळ किती खरा किती खोटा हे जनतेच्या लक्षात आणून देण्याचे काम माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळो वेळी केले आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी कमी चाचण्या करुन महाराष्ट्रातील तीन चाकी आघाडी सरकारने कोरोनाच्या फैलावाला रोखण्यात आपल्याला आलेले अपयश झाकण्याचा प्रयत्न गेले काही दिवस चालवला होता. परंतु चाचण्या वाढवताच रुग्णसंख्या रोज विक्रमी उच्चांक गाठू लागली आहे. शुक्रवारी देखील महाराष्ट्रातील नव्या रुग्णसंख्येने पाच हजार 24 असा उच्चांक गाठला. राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता एक लाख 52 हजार 765 एवढी आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह केसेस 65 हजार 829 आहेत तर आजवर 79 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची असेल तर हा लढा आकडेवारी केंद्रीत असता कामा नये. तो कोरोना केंद्रीत हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रांद्वारे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. परंतु दुर्देवाने रोजची आकडेवारी जपण्याकडे सरकारचा कल दिसतो आहे. शुक्रवारी देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईसोबतच एमएमआर क्षेत्रातसुध्दा कोरोनाचा वाढणारा प्रादूर्भाव, कोरोनाच्या सोयीनुसार नियंत्रित केल्या जात असणार्‍या चाचण्या कोरोनाबळींच्या संख्येत सातत्याने दिसून येत असलेले बदल या सार्‍याकडे त्यांचे लक्ष वेधले. मुंबई महानगर प्रदेशातील निरनिराळ्या महापालिकांमधील संसर्गाच्या वाढत्या दराकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पनवेलमध्ये संसर्गाचा दर 45.69 टक्के इतका असल्याचे यात दिसते. पनवेल शहरात तीन हजार 500 चाचण्या झाल्या असून त्यात एक हजार 599 रुग्ण नोंदले गेले आहेत. जेव्हा जेव्हा रुग्णसंख्या वाढलेली दिसते तेव्हा तेव्हा सरकारकडून चाचण्यांची संख्या कमी केली जाते हे फडणवीस यांनी तारखांनिशी दाखवून दिले आहे. आणखी एक खेळ सरकार करीत आहे त्याकडेही फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. चाचण्यांची संख्या वाढवताना ती मुंबई वगळून राज्यातील अन्य जिल्ह्यांत वाढविली जाते तेथे अधिक चाचण्या आणि कमी रुग्ण यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी दाखवता येते. आतामात्र वेगवान अँटीजेन टेस्टींगमुळे आकडे अफाट वाढण्याचीच शक्यता आहे. आता सरकार काय नवे खेळ करते ते पाहण्याशिवाय जनतेच्या हाती काहीही नाही.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply